पणजी - बेरोजगारीच्या बाबतीत गोवा देशात सातव्या क्रमांकावर असल्याचे मुंबईस्थित सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेच्या मार्च २०२३ च्या सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोव्यात बेरोजगारीचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.
बेरोजगारीची राष्ट्रीय सरासरी ही ७.७ टक्के इतके आहे तर गोव्याचे प्रमाण त्यापेक्षा दुप्पट म्हणजेच १५.९ टक्के इतके असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. फेब्रुवारी २०२३ मधील सर्वेक्षणात गोव्याची बेरोजगारी ११.१ टक्के होती. नव्या सर्वेक्षणानुसार गोव्याची कामगिरी आणखीच खराब झाल्याचे दिसत आहे.
देशात सर्वाधिक बेरोजगारी हरयाणात २६.८ टक्के इतकी आहे तर २६.४ टक्के बेरोजगारी असलेला राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जम्मू काश्मिरात २३.१ टक्के इतकी बेरोजगारी आहे.