गोवा/समीर नाईक | पणजी: गोव्याचे आणि माझे असे घट्ट नाते तयार झाले आहे. ‘जून’ चित्रपटाचा प्रीमियर सुरुवातीला इफ्फीमध्ये झाला होता. नंतर प्लॅनेट मराठीने जून चित्रपटाला पाठिंबा देत ओटीटीच्या साहाय्याने जगभर प्रदर्शित केला. अनेक पुरस्कार यादरम्यान प्राप्त झाले. महत्त्वाचे म्हणजे यंदाचा मला जून चित्रपटासाठी ज्यूरी स्पेशल राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. आता पुन्हा मराठी चित्रपट महोत्सवात हा चित्रपट सहभागी होत आहे, त्यामुळे एक मस्त सर्कल गोव्याबाबत झाले, अशी प्रतिक्रिया सिद्धार्थ मेनन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
‘जून’ला लॉकडाऊन काळाचा अडथळा आला हाेता. त्यामुळे जरा भीती वाटत होती. अनेक प्रश्न उपस्थित होत होते. परंतु या दरम्यान ओटीटीच्या साहाय्याने जगभर हा चित्रपट प्रदर्शित झाला. लोकांपर्यंत पोहोचला याचे समाधान आहे. ओटीटीचे चांगले फायदे आहेतच; परंतु मी जरा सिनेमा हॉल यांना जास्त प्राधान्य देतो. कारण चित्रपटातून व्यवसाय करायचा आहे तर त्याला सिनेमा हॉलशिवाय पर्याय अद्याप नाही, असेही मेनन यांनी पुढे सांगितले.
चित्रपटसृष्टीत मोठे बदल होत आहेत. हे बदल स्वीकारायला पाहिजे. ओटीटी कलाकारांना चांगले व्यासपीठ तयार करून देत आहे. येणाऱ्या काही महिन्यात माझी एक धारावी बँक नावाची मालिका एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुनील शेट्टी, विवेक ओबरॉयसारखे दिग्गज कलाकार आहे. तसेच एक हिंदी चित्रपटही येणार आहे, त्यासाठी लाेकांना प्रतीक्षा करावी लागेल. नक्कीच नव्या गोष्टी शिकायला मिळतात. नवीन अनुभव येतात. त्यामुळे खूप आनंदी आहे, असेही मेनन यांनी सांगितले.
गोवा आवडते ठिकाण
गोवा हे माझे आवडते ठिकाण आहे. येथे वर्षातून दाेन-तीन वेळा येतच असतो. अनेक नाटके, कार्यक्रम येथे झाले आहेत. सेरेंडीपीटी महोत्सवात देखील माझे कार्यक्रम झाले आहेत. त्यामुळे अनेक मित्र-मैत्रिणी येथे आहेत. हॅपी जर्नी या चित्रपटाचे शूटिंग देखील गोव्यातच झाले आहे, असे सिद्धार्थने सांगितले.