- काशीराम म्हांबरे म्हापसा - कारागृहातील कैदी सुद्धा उत्कृष्ट कारागीर असतात. त्यांच्या कलागुणांना वाव दिला तर तेही सिद्ध करून दाखवू शकतात. कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातील कैद्यानी सुमारे 170 किलो कागदाच्या रद्दीचा तसेच टाकाऊ वस्तूंचा वापर करून चतुर्थी निमित्त अत्यंत सुंदर अशी गणेश मूर्ती साकारली आहे. तसेच इको फ्रेंडली देखावा तयार केला आहे. ज्या परिसरात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे त्या परिसरातील सजावट ही अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली आहे. देखाव्याला विद्युत रोषणाईची जोड देण्यात आली आहे.
कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी रोहन धुंगट याच्यासह सुमारे 12 कैद्याने हा अप्रतिम असा देखावा तयार केला आहे. हे तयार करण्यासाठी त्यांना सुमारे एका महिन्याचा कालावधी लागला होता. गणेश मूर्ती सोबत कैद्यांनी तयार केलेल्या देखाव्यात महादेव, अष्टविनायक, शेषनाग, मोर, नंदी, शिवलिंग आधी देखाव्यांचा त्यात समावेश आहे. शिवलिंगावर होणारा अभिषेक, उंच डोंगरावर बसून डोलणारा मोर, पाण्यातील शेषनाग फारच आकर्षक वाटत आहे. कारागृहात दरवर्षी दीड दिवसांचे गणेश पूजन केले जाते पण यावेळी मात्र कारागृहातील गणेश पूजन पाच दिवसांसाठी करण्यात आले आहे. कारागृहात सध्या सुमारे 600 होत जास्त कधी बंदिस्त आहेत.