लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :कला अकादमीच्या कामाच्या दर्जाबाबत टास्क फोर्सने सोमवारी पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा केली. त्यादरम्यान काढलेल्या निष्कर्षावरून कला अकादमीने कामाच्या दर्जाबाबत पास होण्याएवढेही गुण प्राप्त केले नाहीत. ती चक्क नापास झाली, असा दावा टास्क फोर्सचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी केला.
कला अकादमीची पाहणी आणि आवश्यक बदल या पार्श्वभूमीवर खास नियुक्त केलेल्या टास्क फोर्सची बैठक मंगळवारी गोवा मनोरंजन संस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंकरे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत टास्क फोर्सचे सदस्य, कला राखण मांडचे देविदास आमोणकर व इतर उपस्थित होते.
पुढील बैठक १० रोजी, अहवाल मांडणार
कला अकादमीच्या कामांबाबत अनेक समस्या, त्रुटी अजूनही आहेत. यात प्रामुख्याने वातानुकुलीत (एसी) यंत्रणा, छत गळती, साउंड सिस्टम यांसारख्या इतर लहान मोठ्या त्रुटींचा समावेश आहे. नेमका काय बदल करावा लागेल, यासाठी तज्ज्ञांची मदतसुद्धा लागेल. त्यासाठी अहवाल बनविण्यात येईल. तसेच पुढील बैठक दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी अहवाल कला अकादमीच्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मांडण्यात येणार आहे. यावेळी कला अकादमीचे काम केलेल्या सर्व कंत्राटदारांनाही बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती केंकरे यांनी दिली.
सरकारकडून कला, संस्कृती संपविण्याचा प्रयत्न : पाटकर
कला अकादमी प्रकरणात कृती दलाने (टास्क फोर्स) नोंदवलेल्या निरीक्षणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी टीकेची झोड उठवली आहे. सरकारकडून गोव्याची कला व संस्कृती संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. माजी राज्यपाल, लोकायुक्त आणि गोव्याचे सभापती यांच्यानंतर आता मूळ गोंयकार असलेले रंगभूमी आणि चित्रपट व्यक्तिमत्त्व तथा कृती दलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी सरकारला 'भ्रष्टाचाराचे प्रमाणपत्र' दिले आहे, असा टोला पाटकर यांनी हाणला आहे. कला अकादमीचे काम निकृष्ट झाल्याचे कृती दलाचे निरीक्षण बरेच काही सांगणारे आहे. वादग्रस्त कला अकादमी नूतनीकरण कामाच्या तपासकामासाठी नेमलेल्या कलाकारांनाही सरकारने वेदना दिल्या, असेही ते म्हणाले.
सध्या टिप्पणी करणे अयोग्य ठरेल टास्क फोर्सची ही पहिलीच बैठक आहे. अद्याप त्यांचा कला अकादमी संदर्भातील कुठल्याही प्रकारचा अहवाल सरकारला मिळालेला नाही. त्यामुळे टास्क फोर्सच्या विधानावर आता टिप्पणी करणे चुकीचे ठरणार. पण, केवळ एका बैठकीनंतर टास्क फोर्सने कला अकादमीला 'नापास' म्हटले, यावरून त्यांची अपरिपक्चता दिसून येते. मला सध्या तरी यावर काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. - गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री