पणजी : गोव्यासह कर्नाटक, झारखंड व छत्तीसगड या राज्यांच्या खाणमंत्र्यांची बैठक येत्या शुक्रवार १९ रोजी गोव्यात होत आहे. २0२0 साली लीज मुदत संपणार असलेल्या ३४८ खाण लिजांचा लिलांव, जिल्हा खनिज निधीची स्थिती याबाबत विषय चर्चेला येतील तसेच खाण क्षेत्रासमोर असलेल्या अनेक अडचणींवरही विचार विनिमय केला जाईल.केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी वरील राज्यांना पत्र लिहून या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. मंत्र्यांकडे चर्चा करून खाण लिजांच्या लिलांवाबाबतची तयारी तसेच अन्य संबंधित बाबींचा आढावा घेतला जाईल. या बैठकीत जी चर्चा होईल त्यावरून केंद्राला आपल्या पर्यावरण धोरणात आवश्यक त्या सुधारणा करता येतील तसेच खाण व्यावसायिकांसमोर असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत पावले उचलता येतील. खाण क्षेत्रातून आर्थिक विकास साधण्याबरोबरच मेक इन इंडिया अंतर्गत रोजगार निर्मिती यावर भर दिला जाईल.लिलांव करणा-या लागणार असलेल्या खाण लिजांची संख्या गोव्यातच जास्त आहे. देशभरातील ३४८ खाणींची लीज मुदत ३१ मार्च २0१0 रोजी संपत आहे. कर्नाटकात ४५ तर झारखंडमध्ये ३0 खाण लिजांचा लिलांव करावा लागणार आहे.अधिकृत माहितीनुसार गोव्यात २0२0 साली लीज मुदत संपणा-या तब्बल १६0 लोह खनिज खाणींचा लिलांव करावा लागणार आहे. १ जुलै २0१९ पासून या खाण लिजांचा लिलांव करण्याची सूचना केंद्रीय खाण मंत्रालयाने राज्य सरकारला केली असून, त्याबाबत कृती आराखडा मागितला आहे. एमएमडीआर कायद्यात २0१५ साली केलेल्या दुरुस्तीतील कलम ८ (६) नुसार या सर्व लिजांचा लिलांव व्हायला हवा. त्यामुळे लिलांवाचा कृती आराखडा सादर करण्यास संबंधित राज्यांना बजावण्यात आले आहे.
गोवा, कर्नाटक, झारखंड व छत्तीसगढचे खाणमंत्री घेणार भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 1:28 PM