पणजी: गोवा विधानसभा अधिवेशनात विरोधी आमदारांनी शुक्रवारी पुन्हा निषेध व्यक्त करणे सुरु केले. यामुळे झालेल्या गोंधळात सभापती राजेश पाटणेकर यांनी एक तासासाठी कामकाज तहकूब केले. विरोधी पक्षाचे आमदार आपले म्हणणे मांडण्यासाठी दुपारी राजभवनवर राज्यपालांकडे गेले आहेत.
पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना अधिवेशन सुरू असतानाच्या काळात परवा मध्यरात्री अटक झाली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. पण, सभापतींनी चौकशी न करता अटकेसाठी मान्यता कशी दिली, हा विरोधी आमदारांचा प्रश्न आहे. याच विषयावरून शुक्रवारी विरोधी आमदारांनी आवाज उठवला व प्रश्नोत्तराचे कामकाज रोखले.
एका भाजपा प्रवक्त्याला खंवटे यांनी धमकी दिली अशी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी खंवटे यांना अटक केली होती. याविषयी सीसीटीव्ही फुटेज उघड करावी, मग आपण धमकी दिली की नाही ते कळून येईल असे खंवटे यांचे म्हणणे आहे. अलोकशाही पद्धतीने झालेल्या अटकेच्या प्रकरणात राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यासाठी विरोधी गटाचे आमदार दुपारी साडे बारा वाजता दोनापावल येथील राजभवनवर जाऊन राज्यपालांसमोर आपले गाऱ्हाणे मांडल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांना सांगितले. काल विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर सभापतींनी सर्व विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्याचा आदेश दिला होता.