ऑनलाइन लोकमत पणजी, दि. 13 - गोवा विधानसभा बरखास्तीची गरज नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले. विधानसभेचे अधिवेशन सहा महिन्यांत झाले नाही तरी, नवी विधानसभा अस्तित्वात येण्याची प्रक्रिया ही निवडणूक आयोगामुळे लांबली आहे. त्यामुळे गोवा सरकारने चिंता करण्याचे कारण नाही, असा सल्ला राज्याच्या अॅडव्होकेट जनरलांनी आपल्याला तोंडी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, की वास्तविक विधानसभेचे अधिवेशन बोलविण्यास आनंदच वाटला असता; पण नैतिकदृष्ट्या आता अधिवेशन बोलविणे योग्य नव्हे. कारण, नव्या विधानसभेसाठी मतदान झालेले आहे. शिवाय काही आमदारांनी राजीनामे दिल्याने विधानसभेची सदस्य संख्याही कमी झालेली आहे. विरोधी आमदारांचीच संख्या घटलेली आहे.मुख्यमंत्री म्हणाले, की नव्या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपालांनी भाषण करणे अपेक्षित असते. त्यांना सरकारच्या नव्या धोरणांवर व निर्णयांवर बोलावे लागते. नवे सरकार येत्या ११ मार्चनंतर अधिकारावर येईल. त्यामुळे राज्यपाल आताच काय म्हणून बोलतील, असाही प्रश्न येतो. मतदान झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने एक महिन्याचा कालावधी घेतला. त्यामुळे दोष सरकारवर येत नाही. आपल्याला एजींनी तोंडी सल्ला दिला तरी, आपण त्यांच्या लेखी सल्ल्याचीही वाट पाहात आहे. म्हणूनच कायदा खात्याने माझ्याजवळ पाठवलेली फाईल मी अॅडव्होकेट जनरलांकडे पाठवून दिली आहे. (खास प्रतिनिधी)उच्चन्यायालयात याचिका दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास सोमवारी याचिका सादर केली. घटनेतील १७४ कलमाचे पालन करण्यासाठी विधानसभा अधिवेशन बोलवा किंवा विधानसभेचे विसर्जन तरी करा, अशी रॉड्रिग्ज यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एफ. एम. रिईस आणि न्या. नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी घेणे मान्य केले आहे, असे याचिकादार रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
गोवा विधानसभा बरखास्तीची गरज नाही - पार्सेकर
By admin | Published: February 13, 2017 9:15 PM