निवडणूक आयोगाकडे तक्रारींचा पाऊस; काँग्रेसकडून सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 09:48 AM2024-05-08T09:48:25+5:302024-05-08T09:49:40+5:30
बोटावरील शाई गायब, ईव्हीएमही बिघडले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मतदान करण्याआधी निवडणूक अधिका-यांकडून मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई काही वेळातच गायब होत असल्याच्या तक्रारी अनेक मतदारांनी केल्या. याबाबत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करत पणजी विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक आठवर असा प्रकार घडल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.
पणजी महापालिकेच्या माजी नियुक्त नगरसेविका पेट्रिसिया पिंटो यांनीही हा अनुभव सांगितला आहे. मतदान करून आल्यानंतर घरात धुणी- भांडी केल्यावर हातावरील शाई गायब झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उत्तर गोवा मतदारसंघातील एका विशिष्ट मतदान केंद्रात मतदारांच्या बोटांना लावलेली शाई गायब झाल्याच्या तक्रारी विविध सोशल मीडिया हँडलवर आल्या आहेत.
दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनांची पाहणी करून असे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. शाई खरोखरच अमीट आणि दीर्घकाळ टिकणारी असल्याचा दावा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसने दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेपे यांच्याविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार आयोगाकडे सादर केली. पल्लवी यांच्याविरुद्धच्या तक्रारीत पणजी मतदारसंघातील बूथ क्रमांक १५ आणि ११ मधून भाजपला मतदानाचे आवाहन केल्याचा आरोप आहे.
गळ्यात पक्षाचा शेला घातल्याने फळदेसाई यांच्याविरोधात तक्रार
लोकसभा निवडणुकीच्या आचार- संहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठ णकर यांनी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्या विरोधात मुख्य निवडणूक अधिकारी कार्या लयाकडे तक्रार दाखल केली. आमदार फळदेसाई हे कुंभारजुवे मतदारसंघातील मळार-जुने गोवे येथील सरकारी प्राथमिक शाळा असलेल्या मतदान केंद्राबाहेर भाजपचे चिन्ह असलेला शेला परिधान केल्याचे दिसून आले. हा प्रकार म्हणजे निवडणूक आचारसं हितेचा भंग असल्याने निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, असे कवठणकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. फळदेसाई यांनी मतदान केंद्राबाहेर अशा प्रकारे भाजपचे चिन्ह असलेला शेला परिधान करून मतदारांना भूलवण्याचा प्रकार आहे. भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्यास अप्रत्यक्षपणे सांगणे असेच यावरून दिसून येते. त्यांना हा शेला परिधान करून निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रात जाण्यास परवानगी का दिली? त्यांची तपासणीही करण्यात आली नाही. है गंभीर असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
'मोदी वन्स मोअर' टी-शर्टबाबत तक्रार
उत्तर गोवा मतदारसंघातील भाजप उमेदवार तथा खासदार श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात केली. सिद्धेश हे 'मोदी वन्स मोअर' 3 लिहिलेले टी शर्ट घालून बूथवर फिरत असल्याने तक्रार करण्यात आली. सिद्धेश नाईक हे सरकारी मतदान केंद्रावर 'मोदी वन्स मोअर' असे लिहलेले टी शर्ट घालून फिरत होते. प्राथमिक शाळा, साओ पेदो, रायबंदर येथील ११ क्रमांकाच्या केंद्रावर सिद्धेश टी-शर्ट घालून कार्यकर्त्यांसोबत फिरत होते. असे तक्रारीत कवठणकर यांनी नमूद केले आहे.
नोटीस आल्यानंतर योग्य ते उत्तर देऊ : सिद्धेश नाईक
काँग्रेसने अनेक पत्रकार परिषदा घेऊन पाहिल्या आणि सोशल मीडियावरदेखील मते मागून पाहिली. परंतु त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने काँग्रेस निराश झाली आहे. यामुळे ते निवडणुकी दिवशी केवळ तक्रारी दाखल करण्यास व्यस्त आहेत. मला निवडणूक आयोगाकडून जेव्हा नोटीस येईल, तेव्हा मी योग्य ते उत्तर देईन असे प्रत्युतर सिद्धेश नाईक यांनी दिली. पण, भाजपला मिळत असलेला प्रतिसाद पाहता काँग्रेस हताश झाली, हे आता स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.
फात्राडे-वार्कात ईव्हीएम बिघडले
फात्राडे-वार्का येथे बूथ क्रमांक ३१ वर एक इव्हीएम मशीन नादुरुस्त झाले. त्यामुळे मतदारांना सुमारे पाऊण तास ताटकळत उभे राहावे लागले. केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सुमारे ३५ मिनिटांनंतरही पर्यायी व्यवस्था न केल्याने मतदारांनीही नाराजी व्यक्त केली. ईव्हीएम बिघडल्याची माहिती दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंदू यांनाही देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली आणि पर्यायी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिले.