यंदाची गोवा लोकसभा निवडणूक अन् काँग्रेससमोरील आव्हानात्मक स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2024 12:32 PM2024-04-14T12:32:55+5:302024-04-14T12:33:35+5:30
काही भागात लोकांना बदल व्हावा असे वाटते. काही भागात काँग्रेसला आपसुकच मते मिळतात. मात्र काँग्रेसला तरीही गोव्यात आव्हानात्मक स्थिती आहे.
- सद्गुरू पाटील
काही भागात लोकांना बदल व्हावा असे वाटते. काही भागात काँग्रेसला आपसुकच मते मिळतात. मात्र काँग्रेसला तरीही गोव्यात आव्हानात्मक स्थिती आहे. काँग्रेसचे उमेदवार सर्व गावांमध्ये व सर्व लोकांमध्ये आता पोहोचू शकत नाहीत. वेळ कमी आहे. त्यामुळे आव्हान आहे हे मान्य करावे लागेल. अल्पसंख्यांकांची मते यावेळी काँग्रेसला मिळतील असे गृहित धरले तरी, हिंदू मतदारच निर्णायक ठरतील असे म्हणण्यास खूप वाव आहे.
गोव्यात काँग्रेस पक्ष आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तरी हृदयात राहिलेला आहे काय असा प्रश्न विचारण्यासारखी स्थिती आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीसाठी वेळेत उमेदवार दिले नाहीत. गोव्याच्या ग्रामीण भागातील मतदार अजून काँग्रेससोबत आहेत. मात्र काँग्रेसचे काही नेते, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते हेच पक्षासोबत नीट नाहीत. त्यांच्या हृदयात काँग्रेस पक्ष असण्याचा प्रश्नच नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर परवाच बोलले की काँग्रेस हा लोकांच्या हृदयात आहे. अर्थात अशा प्रकारची विधाने ही वाचण्यासाठी चांगली असतात, पण काँग्रेसला जर मते अपेक्षित प्रमाणात मिळाली नाहीत तर पक्ष केवळ हृदयातच शोभून दिसेल. पक्ष हृदयात असून मते मिळत नसतील तर काय फायदा?
मते मिळण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना पूर्ण गोव्यात सगळीकडे फिरावे लागेल. परता माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जुझे फिलिप डिसोझा हे वास्कोत फिरत होते. काँग्रेसला यावेळी मत द्या, अशी विनंती जुड़ो फिलिप वास्कोत लोकांना भेटून करत होते. मात्र लोकांनी तुमचा उमेदवार कुठे, विरिवातो कुठे असा प्रश्न केला, याचा अर्थ असा की-विरियातो अजून वास्कोतील मतदारांसमोर पोहोचलेले नाहीत, किंवा पोहोचले असतील तर जुझे फिलिप डिसोझा यांच्यासोबत विरियातो अजून फिरलेलेच नाहीत, असा अर्थ होतो, उमेदवाराला सोबत घेऊन इंडिया आघाडीचे सगळे घटक एकत्र फिरत नसावेत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) इंडिया आघाडीसोबत आहे, मग जुझे फिलिप डिसोझा यांच्यासोवत उमेदवाराने फिरायला नको काय?
फ्रान्सिस सार्दिन यांच्यापेक्षा विरियातो हे निश्चितच प्रभावी उमेदवार आहेत. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी स्थिती वेगळी होती, त्यावेळी सार्दिन जिंकले कारण बाबू कवळेकर, दिगंबर कामत वगैरे अनेकांनी सार्दिनचा प्रचार केला होता. शिवाय स्वी नाईक, संकल्प आमोणकर हेही त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. आता त्या अर्थाने पाहायला गेल्यास विरियाती बिचारे एकटेच आहेत, फक्त केपेचे आमदार एल्टन आणि विरोधी पक्षनेते यूरी आलेमाव हे दोनच आमदार विरियातोसोबत आहेत, सार्दिन व गिरीश चोडणकर यांनी असहकार पुकारला आहे.
अमित पाटकर, युरी आणि एल्टन हे तिघेच विरियातोसाठी जास्त कष्ट घेत आहेत. मात्र केवळ सासष्टी व मुरगाव तालुका म्हणजे पूर्ण दक्षिण गोवा मतदारसंघ नव्हे. सार्दिन यांना पूर्ण दक्षिण गोवा आणि पूर्ण गोवा राज्य ओळखत होते. तो त्यांचा प्लस पॉईंट होता. पण विरियाती यांच्याचाबत तसे नाही, विस्थिातो यांना पूर्ण दक्षिण गोवा ओळखत नाही. पूर्ण दक्षिण गोवा विरियातोनेही स्वतः कधी फिरून पाहिलेला नाही, सांगे-सावर्डे-केपे फोडा-शिरोडा-मडकईच्या पट्ट्यात विरियातो यांना किती मते मिळू शकतात, याचा आढावा तरी काँग्रेसने घेतला आहे काय? २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला विविध नेत्यांनी मिळून त्या पट्टचात बऱ्यापैकी मते मिळवून दिली होती. मडकई, फौंडा या दोन मतदारसंघात सुदिन ढवळीकर व रवी नाईकांमुळे काँग्रेसला मते मिळाली होती. शिरोड्यात जास्त मते मिळाली नव्हती.
भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी सर्व भागांमध्ये फिरणे सुरु ठेवले आहे. शिवाय भाजपची पन्ना प्रमुख संमेलने होत आहेत. महिला मोर्चाचे एकत्रीकरण होत आहे. अशावेळी काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यात कमी पडला तर त्यात विरियातो यांची हानी होईल असे राजकीय अभ्यासक मानतात. सासष्टी तालुक्यात समजा काँग्रेसला मतांची आघाडी मिळाली तरी भाजपचे नुकसान होणार नाही. कारण पूर्वीच्या खाणग्रस्त भागात व फोंडा तालुक्यात भाजपचे मतदार व कार्यकर्तेही संख्येने खूप आहेत. मुरगाव तालुक्यात यावेळी संकल्प, दाजी व माविन मुदिन्हों है तीन नेते भाजपकडे आहेत. त्यामुळे मुरगाव तालुक्यात काँग्रेस पक्ष जास्त अपेक्षा धरू शकत नाही.
सासष्टीतील मडगावमध्ये दिगंबर कामत झोकून देऊन सध्या काम करत आहेत. काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी खरे म्हणजे गोव्यात तळ ठोकायला हवा होता, पण तसे घडत नाही. काँग्रेसच्या गट समित्या विविध मतदारसंघांमध्ये सक्रिय नाहीत. सावर्डे, सांग आणि फोंडा तालुक्यात भाजपची यंत्रणा खूप सक्रिय दिसते, काँग्रेसचे कार्यकर्ते अजून उत्साहीत होण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांना दक्षिणेत येऊन सभा घ्याव्या लागतील, गोवा भाजपने पंतप्रधानांची एक सभा दक्षिण गोव्यात घेण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान मोदी जर दक्षिणेत आले तर दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकत्यांमधील चैतन्य आणखी वाढेल.
उत्तर गोव्यात रमाकांत खलप देखील सर्व वाहधांपर्यंत, गावांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, खलपांचा प्रचारही उशिरा सुरू झाला आहे. वास्तविक खलपांना काँग्रेसने यावेळी तिकीट देऊन अखेरची संधी दिली आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे यावेळी पूर्णपणे उत्तर गोव्यातील मंत्री, आमदारांवर अवलंबून आहे. भाऊंबाबत नाराजी असली तरी, भाजपची पक्ष संघटना उत्तरेत खूप मजबूत आहे. मंत्री, आमदारांची संख्या उत्तर गोव्यात भाजपकडे सर्वाधिक आहे. तिसवाडी, पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके भाजपने अगोदरच काबिज केलेले आहेत. वीस वर्षांपूर्वी काँग्रेसकडे अनेक सरपंच, पंच, नगरसेवक असायचे, आता ते बळ भाजपकडे आहे. उत्तर गोव्यातील काँग्रेस गट समित्या जास्त सक्रिय नाहीत. खलप आपल्यापरीने धडपड करत आहेत, काँग्रेसचे काही माजी आमदार खलपांना मदत करतील. मात्र त्यांनाही काही मर्यादा आहेत. आता कळंगुटमध्ये आग्नेल फर्नाडिस यांचे बळ राहिलेले नाही.
यावेळी उत्तर व दक्षिण गोव्यात आरजीचे उमेदवार किती मते मिळवतील याकडेही लोकांचे लक्ष आहे. दक्षिण गोव्यात आरजी पूर्वीएवढी मते मिळवू शकणार नाही, असा दावा काँग्रेसचे काही नेते करतात, काँग्रेसच्या उमेदवारांना मत देण्यासाठी काही भागातील लोक स्वतःहून तयार आहेत, पण प्रचार करण्यासाठी काँग्रेसकडे पुरेशा संख्येने कार्यकर्तेच नाहीत. संघटनात्मक पातळीवर काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. तसे गट भाजपमध्येही असले तरी, पंतप्रधान मोदींच्या नावाने सगळे एकत्र आलेले आहेत. पुन्हा केंद्रात मोदींचे सरकार यायला हवे म्हणून श्रीपादना व दक्षिणेत पल्लवींना मत द्या, असे आवाहन भाजपचे बहुतेक मंत्री व आमदार करतात. काँग्रेसचे कार्यकर्ते कोणते आवाहन करतात? कार्यकत्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, पण आता वेळच कमी आहे. आता उमेदवारांनी आपली तोंडे सर्व पंचायत क्षेत्रांना व पालिका क्षेत्रांना दाखवली तरी खूप झाले असे लोक म्हणतील, काँग्रेससमोर आव्हानात्मक स्थिती आहे हे मान्य करावे लागेल.