आव्हाने-प्रतिआव्हानांनी तापले राजकारण; एकमेकांच्या कामगिरीस दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2024 08:26 AM2024-04-09T08:26:36+5:302024-04-09T08:27:22+5:30
खलप, विरियातो, श्रीपाद यांचे विविध दावे
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी:काँग्रेसने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केल्याने आव्हाने - प्रतिआव्हाने, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यात खऱ्या अर्थाने 'इलेक्शन फिव्हर' निर्माण झाला आहे. निवडणूक होईपर्यंत ही रणधुमाळी चालूच राहणार आहे.
केंद्रात मंत्री व खासदार म्हणून श्रीपाद नाईक यांनी गेल्या २५ वर्षांत काय केले ते खुल्या व्यासपीठावर येऊन सांगावे. नपेक्षा अठरा महिने केंद्रात मंत्री असताना मी काय केले ते सांगतो, असे थेट आव्हान काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी दिले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना खलप म्हणाले, २५ वर्षात श्रीपाद यांनी गोव्यासाठी काय केले ते लोकांना कळायला हवे. खलप यांनी काल एका चॅनेलशी बोलताना भाऊंच्या विधानाचा समाचार घेतला. खलप म्हणाले की गोव्याची जीवनदायिनी म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवले तरी श्रीपाद यांनी चकार शब्दही काढला नाही. केंद्रात मी खासदारा बनलो आणि काँग्रेस सरकार सत्तेवर आले तर मी म्हादईचे पाणी वळविण्यास प्राणपणाने विरोध करीन.
काय म्हणाले होते श्रीपादभाऊ नाईक?
श्रीपादभाऊंनी रविवारी खलप यांनाही टोला हाणताना १९९९च्या लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रात मंत्री असतानाही खलप यांना मला पराभूत करणे जमले नाही ते आता काय जमणार? असा खोचक सवाल करून टोला हाणला होता. काँग्रेस फक्त विजयाची स्वप्ने पाहात आहे, अशी टीका श्रीपाद यांनी केली होती.
'आरजी'ने उमेदवार मागे घ्यावेत : विरियातो
काँग्रेसचे दक्षिणचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी आरजीने आपले उमेदवार मागे घ्यावेत, असे आवाहन केले आहे. सर्वांनाच ठाऊक आहे की आरजीचे उमेदवार जिंकणार नाहीत. त्यामुळे मते वाया घालवू नका. अजूनही उशीर झालेला नाही. गोव्याच्या हितासाठी उमेदवार मागे घ्या. आरजीने उमेदवार मागे घेतले तर या धाडसी निर्णयाबद्दल सर्वांच्या ते कायम स्मरणात राहतील.
कळंगुटची वाट का लागली? : खलप
श्रीपादभाऊंना प्रश्न करताना खलप म्हणाले की, कळंगुटची वाट का लागली? राज्यात येणाऱ्या पर्यटकांना किनाऱ्यावर बाथरुम, चेंजिंग रुम शोधाव्या लागतात. एवढी वर्षे पर्यटन राज्यमंत्री म्हणून काम करताना तुम्ही काय केले? कळंगुटला काय चालते, हे तुम्ही पाहिले आहे का? उगाच माझ्याविषयी खोटी माहिती पसरवू नका, असा सल्ला काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी दिला आहे.
आम्हाला ज्ञानाचे डोस पाजू नयेत : मनोज परब
आरजीचे उमेदवार मनोज परब म्हणाले, कुठल्या गोवकराने आरजीचे उमेदवार जिंकणार नाहीत, असे सांगितले? उलट विरियातो हे काँग्रेसने आयात केलेले उमेदवार आहेत. स्वतःची संघटना वाऱ्यावर सोडून ते काँग्रेसमध्ये आले. त्यांनी आम्हाला ज्ञानाचे डोस पाजू नयेत. दाबोळी मतदारसंघातील लोक वगळता त्यांना दक्षिणेत कुठल्याही मतदारसंघात लोक ओळखत नाहीत, असा टोला लगावला.