- वासुदेव पागीपणजी - माझी मंत्री दीपक पाऊस्कर यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार पल्लवी धेम्पे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि सावर्डे मतदारसंघातील आमदार गणेश गावकर यांनी शनिवारी पाऊसकर यांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूने प्रचार कामात मुसंडी मारताना दुसऱ्या बाजूने पक्षावर नाराज असलेले पक्षाचे आजी-माजी नेते यांना भेटून त्यांना राजी करण्याचा सपाटा भाजपने चालविला आहे. शनिवारी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी सावर्डे चे आमदार गणेश गावकर यांच्यासह पाऊस कर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल अद्याप काहीच बाहेर आलेले नाही मात्र पाऊसकर हे भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यासाठी काम करण्यास राजी झाले आहेत. आपला पाठिंबाही त्यांनी भाजप उमेदवाराला जाहीर केला आहे. मुख्यमंत्री डॉक्टर सावंत आणि आमदार गावकर यांच्याबरोबर त्यांनी एकत्र फोटोही दिला आहे. काँग्रेसचा दक्षिणेकडील गड असा मानला जाणारा मुरगाव मतदारसंघ यावेळी सर करण्यासाठी भाजपने आपली प्रतिष्ठा पणास लावली आहे.
त्यासाठी पक्षाकडून कोणतीही कसर सोडली जात नाही. काही दिवसांपूर्वी डॉक्टर सावंत यांनी काणकोणचे माजी आमदर इजिदोर फर्नांडिस यांची भेट घेऊन त्यांनाही प्रचार कार्यात सामील करून घेतले होते. उत्तर गोव्यात माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे पूर्वीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांचीही भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तनावडे आणि स्वतः उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट घेतली होती. काही कारणामुळे पक्ष सोडलेल्या, पक्षापासून दूर गेलेल्या, रुसलेल्या, नेत्यांना जवळ आणण्याचा सपाटा पक्षाने चालविला असून त्यात पक्षाला यशही मिळताना दिसत आहे.