लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात ७ मे रोजी मतदान प्रक्रिया आहे. काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर करण्यास विलंब केला. परिणामी भाजपने आपल्या उमेदवारांच्या प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली. भाजपने काँग्रेसच्या आधी उमेदवार जाहीर करून प्रचाराचा बारही उडवून दिला. इंडिया आघाडीच्या म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येक वाड्यावर १६ पोहोचणे आता शक्य होणार नाही. प्रत्येक पंचायत क्षेत्रात पोहोचणे रमाकांत खलप व विरियातो फर्नाडिस यांना शक्य झाले तरच त्यांनी खऱ्या अर्थाने प्रचार केला, असे म्हणता येईल. काँग्रेसचे नेहमीच वरातीमागून घोडे असा प्रकार असतो. यावेळची लोकसभा निवडणूक ही एकतर्फी नाही.
२०१९ साली श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यात जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला नव्हता. आता श्रीपादभाऊंना संघर्ष करावा लागतोय, कारण यावेळी ते सहाव्यांदा लढत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपचे कार्यकर्तेदेखील श्रीपाद नाईक यांच्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. स्वतः श्रीपादभाऊ सगळीकडे फिरून प्रचार करत आहेत. मात्र आजचे तरुण श्रीपादभाऊंना प्रश्न करतात. गेल्या पंचवीस वर्षांत तुम्ही काय काम केले ते सांगा, असा आग्रह धरतात, अर्थात श्रीपाद नाईक यांनी काम केले नाही, असा अर्थ होत नाही. मात्र नागरिक प्रश्न करतात, तरुण पोटतिडकीने बोलतात ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस पक्ष किंवा इंडिया आघाडी मात्र या स्थितीचा लाभ घेण्यात कमी पडत आहे. कारण खलप यांनीही जनसंपर्काचे काम वेळेत सुरू केले नव्हते. अगोदर तिकीट मिळू द्या, मग आपण प्रचार सुरू करीन, अशी खलप यांची भूमिका होती. तिकीट मिळण्यापूर्वी देखील गावागावांत फिरण्याचे काम खलप यांनी हाती घेतले असते तर त्यांना पूर्ण उत्तर गोवा पिंजून काढणे शक्य झाले असते.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे दुर्दैव असे की- अनेकदा त्या पक्षाचे उमेदवार गंभीरपणे प्रचार करतच नाहीत. ज्या तळमळीने लोकांपर्यंत पोहोचायला हवे, त्या तळमळीने ते पोहोचत नाहीत. अर्थात हे खलपांना लागू होत नाही. मात्र यापूर्वीच्या काळात जेव्हा गिरीश चोडणकर, रवी नाईक, स्व. विली डिसोझा, स्व. जितेंद्र देशप्रभू आदींनी उत्तरेतून निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांच्यातील काही जण सत्तरी तालुक्यापर्यंत देखील पोहोचले नव्हते. देशप्रभू यांनी श्रीपाद नाईक यांना जबरदस्त टक्कर दिली होती, त्यात देशप्रभू यांचे योगदान मोठे नव्हते. त्यात खरे योगदान काँग्रेसच्या त्यावेळच्या बलाढ्य आमदारांचे होते. एका सत्तरी तालुक्यातून विश्वजित राणे यांनी त्यावेळी देशप्रभू यांना मोठी आघाडी मिळवून दिली होती. तिसवाडीतही तेव्हा काँग्रेसचे बहुसंख्य आमदार होते. आता श्रीपाद नाईक यांचे सुदैव असे की-उत्तरेत बहुतेक आमदार हे भाजपचेच आहेत. केवळ एकच आमदार काँग्रेसकडे आहे. तिसवाडी, पेडणे, सत्तरी, डिचोली या तालुक्यांत काँग्रेसकडे आज एकही बलाढ्य नेता नाही.
भाजपने आपल्या काही माजी आमदारांनाही सक्रिय केले आहे. काँग्रेसचे माजी आमदार जास्त सक्रिय कधी होत नसतात. सत्ता असते तेव्हाच ते सक्रिय होतात. आजच्या युवा-युवतींना नोकऱ्या हव्या आहेत. सरकारी नोकऱ्यांबाबत मंत्री, आमदारांना लोक विचारतात. काही भाजपवाल्यांची त्यामुळे थोडी गोची होते, पण नोकरीचे आश्वासन देऊन त्या स्थितीवर ते मात करतात. विमानतळ आले पण नोकऱ्या स्थानिकांना मिळाल्या का, असेही काही जण विचारतात. दक्षिण गोव्यात भाजपने यावेळी प्रथमच महिला उमेदवार उभा केला आहे. पल्लवी धेंपे आपल्या आयुष्यातील पहिली निवडणूक लढवत आहेत.
काँग्रेसने फ्रान्सिस सार्दिन या खासदाराला तिकीट नाकारले. अर्थात सार्दिन यांना लोक कंटाळले होते. सार्दिनही निवडून आल्यानंतर पूर्ण दक्षिणेत कधी फिरलेच नाहीत. त्यांनाही लोकांनी प्रश्न केले असते, पण ते आता आराम करत आहेत ही चांगली गोष्ट. कॅप्टन विरियातो यांना काँग्रेसने तिकीट दिले. विरियातो यांना पूर्ण दक्षिण गोवा पिंजून काढण्यासाठी वेळ कमी आहे. केवळ ख्रिस्ती मतांवर कुणी निवडून येत नसतो. सांगे-सावर्डे-कुडचडे-केपे या पट्ट्यात आणि फोंडा तालुक्यात भाजप कायम सर्वाधिक मते मिळवतो. तिथे काँग्रेस संघटनाही मजबूत नाही. अशावेळी कॅप्टन विरियातो यांची खूप दमछाक होईल, हे कळून येतेच.