Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:काँग्रेसने १८९ उमेदवारांची सहावी यादी काल जाहीर केली; परंतु या यादीतही गोव्यातील दोनपैकी एकाही जागेचा समावेश नाही. उद्या, दि. २८ रोजी गोव्याचे उमेदवार जाहीर होतील, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याशी संपर्क - साधला असता ते म्हणाले की, २७ रोजी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. तेलंगणा, गोवा, दादरा नगर-हवेली वगैरेंचे उमेदवार निश्चित केले जातील. दि. २८ रोजी उमेदवारांची यादी जाहीर होईल. त्यात गोव्यातील दोन्ही जागांचा समावेश असेल.
दक्षिण गोव्यात भाजपने महिला उमेदवार दिल्याने काँग्रेस आता कोणती रणनीती वापरतो हे पाहावे लागेल, दक्षिणेतून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यात, तर उत्तर गोव्यात माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व विजय भिके यांच्यात स्पर्धा आहे.
समन्वय समिती स्थापन करणार : पालेकर
'इंडिया' आघाडीत घटक असलेले आपचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर म्हणाले की, २८ रोजी युतीचा उमेदवार जाहीर होताच समन्वय समिती स्थापन केली जाईल व आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत. बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगश यांना तिकीट देण्याचे आम आदमी पक्षाने जाहीर केले होते, त्यानंतर निर्णय मागे का घेतला, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, बाणावलीतील लोकांना वेंझी दिल्लीत गेलेले नको होते, त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव पुढे न नेण्याचे ठरवल्याचे सांगितले.