साहाय्यक लाइनमन मृत्यू प्रकरणी कॉग्रेसची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
By किशोर कुबल | Updated: April 25, 2024 14:36 IST2024-04-25T14:35:08+5:302024-04-25T14:36:15+5:30
Goa Lok Sabha Election 2024: व्हाळशी, डिचोली येथे साहाय्यक लाइनमन मनोज जांबावलीकर याचा वीज खांबावर दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणात कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.

साहाय्यक लाइनमन मृत्यू प्रकरणी कॉग्रेसची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
- किशोर कुबल
पणजी - व्हाळशी, डिचोली येथे साहाय्यक लाइनमन मनोज जांबावलीकर याचा वीज खांबावर दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणात कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. वीज खात्याच्या संबंधित बेजबाबदार अधिकाय्रांविरुध्द गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी कवठणकर यांनी केली आहे.
साहाय्यक लाइनमन जांबावलीकर हा दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का लागून ठार होण्याची घटना १९ रोजी घडली होती. त्यानंतर खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी त्याचा मृत्यू जवळच असलेल्या कारखान्याच्या इन्वर्टरमधून उलट विद्युत प्रवाह आल्याने त्या धक्क्याने झाल्याचे कारण दिले होते. कवठणकर यांनी तक्रार पत्रात या प्रकरणी पोलिसांनी अजून कोणाही विरुध्द गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. या प्रकरणी जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्याविरुध्द भादंसंखाली गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी कवठणकर यांनी केली आहे.
दरम्यान, वरील घटनेला पाच दिवसही उलटले नसताना बुधवारी फोंडा येथे एका ट्रन्सफॉर्मरवर दुरुस्तीकाम करताना उपेंद्र नाईक हा लाइनमन विजेच धक्का लागून जखमी झाला.