संविधानाचा अपमान; दक्षिण गोव्यातील इंडिया आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध तक्रार
By किशोर कुबल | Published: April 23, 2024 01:38 PM2024-04-23T13:38:37+5:302024-04-23T13:41:16+5:30
Goa Lok Sabha Election 2024: भारतीय राज्य घटनेचा अपमान केल्या प्रकरणी ‘इंडिया’ आघाडीचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्याविरुध्द भाजप प्रदेशाध्यक्षांची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली असून विरियातोंची उमेदवारी बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
- किशोर कुबल
पणजी - भारतीय राज्य घटनेचा अपमान केल्या प्रकरणी ‘इंडिया’ आघाडीचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्याविरुध्द भाजप प्रदेशाध्यक्षांची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली असून विरियातोंची उमेदवारी बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीसोबत विरियातो यांच्या आक्षेपार्ह भाषणाची व्हिडिओ क्लीपही जोडली आहे. पत्रकार परिषदेत आमदार दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी माजी आमदार तथा पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक, माजी मंत्री तथा उपाध्यक्ष दिलिप परुळेकर व आमदार ग्लेन तिकलो तिकलो उपस्थित होते.
कामत म्हणाले की, ‘विरियातो यांचे हे विधान राष्ट्रविरोधी आहे. उमेदवारी अर्ज भरताना भारतीय घटनेचा आदर करीन, अशी शपथ प्रत्येक उमेदवार घेत असतो. परंतु विरियातो यांनी ही शपथ तोडली आहे. १९६१ साली गोवा मुक्त झाला तेव्हा भारतीय घटना गोमंतकीयांच्या माथी मारली, हे त्यांचे विधान आक्षेपार्ह आहे. त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरु पंतप्रधान होते. कॉग्रेसने याबाबत भूमिका स्पष्ट करावी. विरियातो यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान केला आहे.’