Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: खासदार फ्रान्सिस सार्दिन हे मतदारांपर्यंत पोहचलेच नाहीत, हे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी मान्य केले.
प्रसार माध्यमांशी बोलताना एल्टन म्हणाले की,' सार्दिन आमच्याकडे गेल्या पाच वर्षात पोचलेच नाहीत, असे काही मतदार म्हणतात. त्याबद्दल आम्हाला दिलगिरी व्यक्त करावी लागेल. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉग्रेस जो उमेदवार देईल त्याने निवडून आल्यानंतर प्रत्येक गावात भेट द्यावी लागेल. मी उमेदवाराचा प्रचार करणार त्यामुळे माझीही जबाबदारी राहील की, निवडून आल्यास पुढील पाच वर्षे उमेदवाराने गावागावात जाऊन लोकांच्या गाठीभेटी घ्याव्यात.'
एल्टन एका प्रश्नावर म्हणाले की, 'भाजप सरकारच्या या कारकिर्दीत राज्यातील सर्वसामान्यांना कोणीच वाली राहिलेला नाही. केपें मतदारसंघातील वावुर्ला गावात ६२ वर्षे वीज मिळाली नाही. काजुगट्टा भागात रस्ता नव्हता तो आठवडाभरापूर्वी झालेला आहे.'
एल्टन म्हणाले की, 'सरकार मोठमोठ्या घोषणा करत असले तरी कल्याणकारी योजनांचे मानधन थकलेले आहे. विधवांना गेले सहा महिने अर्थसाहाय्य मिळालेले नाही.
दक्षिणेत गिरीश की कॅप्टन विरियातो ?
दरम्यान, ताज्या घडामोडींनुसार दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटासाठी माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांच्यातच स्पर्धा आहे. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे नाव मागे पडल्याची चर्चा आहे. गिरीश यांनी २०१९ मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु त्यात त्यांना अपयश आले होते. आता त्यांना दक्षिण गोव्यातून संधी मिळू शकते. दक्षिणेत गिरीश की विरियातो? याबाबत उत्कंठा आहे.
कार्यकर्ते, इच्छुकांचे दिल्लीकडे डोळे
येत्या बुधवारी (दि. २७) काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत होणार असून तीत गोव्यातील दोन्ही उमेदवार ठरतील, असे सांगण्यात येते. उत्तर गोव्यात माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, विजय भिके व राजन घाटे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपने दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपो यांच्या रुपाने महिला उमेदवार दिला. त्यामुळे आता काटशह देण्यासाठी काँग्रेसची काय रणनीती असेल, याकडेही राजकीय विश्लेषक उत्कंठेने पहात आहेत. पल्लवी धेपे यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात काँग्रेसची कसोटी लागणार आहे.