Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दिल्लीहून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पल्लवी धेंपे येथील भाजप कार्यालयात दाखल झाल्या. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पल्लवी म्हणाल्या की, 'भाजपने दिलेली ही संधी मी अत्यंत नम्रपणे स्वीकारते. मला उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच केडरमधील इतर सर्वांचे मी आभार मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची दूरदृष्टी व भाजपच्या तत्त्वांचा मी नेहमीच आदर करत आले आहे.'
पत्रकारांनी त्यांना अचानक राजकारणाकडे कशा काय वळलात?, तसे विचारले असता 'ही सुरुवात असल्याचे त्या म्हणाल्या. 'भाजपाची तत्वे मला भावली म्हणून मी या पक्षाची उमेदवारी स्वीकारली', असे त्यांनी सांगितले. प्रचाराच्या वगैरे काही योजना तुम्ही आखल्या आहेत का? अशा असे विचारले असता 'अद्याप प्रचार आराखडा तयार केलेला नाही', असे त्यांनी सांगितले.