Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सासष्टी तालुका हा राज्यात राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथील लोकांना राजकारण्यांकडून विकासाच्या अनुषंगाने काही अपेक्षाही आहेत. राज्यातील आर्थिक, व्यावसायिक उलाढालीचे मुख्य केंद्र असलेल्या मडगाव शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यापासून ते पोलिस सुरक्षा अधिक बळकट करण्यापर्यंत अपेक्षा लोकांच्या आहेत. याशिवाय, खासदारांनी किनारपट्टीचा विकास करावा, अशी अपेक्षा व्यक्त आहे.
सासष्टी तालुक्यात आतापर्यंत या मतदारसंघांत काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. मात्र, नव्या राजकीय समीकरणात चित्र बदलले आहे. पण मडगावसारख्या शहरात अजूनही वाहतूक सिग्नल्स सुरू नसतात. सायंकाळी रस्ते ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच जावे लागते. रात्री तर वाहतूक पोलिस गस्तीवरही नसतात. वाहतुकीची कोंडी ही शहराचा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. सासष्टीला विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. मात्र, अपवाद सोडला तर सर्वच किनारे अस्वच्छ आहेत. त्यासाठी खासदार काहीतरी करतील अशी अपेक्षा आहे.
रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचा प्रश्नच
तालुक्यात रेल्वे मार्ग दुपरीकरणाला स्थानिकांनी विरोध केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. माजोर्डा ते वास्कोपर्यंतच्या जनतेला सध्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण नकोच, असेच वाटते. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनीही वारंवार माजोर्डा ते वास्को रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण नकोच, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
निधीचा समान वापर हवा
केंद्र सरकारच्या योजना राज्यातील लोकांपर्यंत कशा पोहोचतील याचा विचार करून त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. खासदार निधीचा वापर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात समान पद्धतीने व्हावा यासाठी नियोजन व्हायला हवे, अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली.
युवकांना हवे रोजगार मार्गदर्शन
निवडून येणाऱ्या खासदारांनी राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना केंद्र सरकारच्या रेल्वे, पोस्ट, एनआयटी, आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ, आयुष्य इस्पितळ तसेच इतर केंद्रीय आस्थापनेत नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अनेक युवकांना केंद्र सरकारची नोकरी मिळवण्यास काय करावे लागते, याचे मार्गदर्शन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा लोकांची आहे.
खासदारांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघातील सर्व भागांना भेट देऊन समस्या आणि मागण्या जाणून घ्यायला हव्यात. राज्यात ठिकठिकाणी स्मशानभूमीचा प्रश्न ज्वलंत आहे. तो सोडविण्याच्या दृष्टीने खासदार निधीतून प्रस्ताव मार्गी लावणे शक्य आहे. आरोग्य उपकेंद्राची स्थिती सुधारावी. - सुरेंद्र शिरोडकर, मडगाव.
दक्षिण गोवा जिल्ह्यात दुहेरीकरणाचा प्रकल्प रद्द केला पाहिजे. केंद्र सरकारने सागरमाला प्रोजेक्ट रद्द करावा, अशी आमची नव्या खासदारांकडून अपेक्षा आहे. - अभिजीत प्रभुदेसाई.
खासदारांना निवडून आल्यानंतर अनेक विकासकामे मार्गी लावता येतात. सध्याच्या काळात ठिकठिकाणी वाहतूककोंडीचा प्रश्न भेडसावतो, तो दूर करण्याच्या दृष्टीने जंक्शनवर वाहतूक सिग्नल बसविणे, छोटे पार्किंग प्रकल्प उभारणे किंवा अन्य उपाययोजना राबविणे अशी कामे ते करू शकतात. सद्यस्थितीत अशा कामांची गरज आहे. - अशोक नाईक, मडगाव.
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी राज्यात पोर्तुगीज राजवटीमुळे गमावलेले गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, पोर्तुगीज राजवटीत मोठ्या प्रमाणात हिंदूंची मंदिरे पाडण्यात आली. त्यांनी राज्याच्या संस्कृतीवर हल्ला केला होता. त्यामुळे संस्कृती नष्ट करण्यात आली. परंतु, राज्यातील हिंदू बांधवांनी ती बऱ्याच प्रमाणात टिकवून ठेवली. हे वैभव पुन्हा मिळविण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी दक्षिण गोवा व उत्तर गोवा या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी काम केले पाहिजे. - विनोद पवार, मडगाव.