- किशोर कुबल पणजी - गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी दुपारी १ वाजेपर्यंत पहिल्या सहा तासात पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे ४९.०४ टक्के मतदान उत्साहवर्धक आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. दक्षिण गोव्यात कांसावली येथे सेंट थॉमस स्कूल मतदान केंद्रावर सीआरपीएफ जवानांनी पोलिंग एजंटना बाहेर काढल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही एकमेव घटना वगळता राज्यात शांततापूर्ण मतदान चालू आहे.
दक्षिण गोव्यात प्रति तास ७ ते ८ टक्के मतदानाचा दर चांगला आहे आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७५ टक्के मतदान सहज पार केले जाऊ शकते असे विश्लेषकांनी सांगितले. जास्त उष्णतेमुळे दुपारी १ ते ३ पर्यंत मतदानाचे प्रमाण कमी होऊ शकते आणि दुपारी ३ वाजल्यापासून वेग वाढू शकतो आणि ताशी ९ ते १० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
उत्तर गोव्यात पणजी, म्हापसा, पेडणे येथील मतदार निरुत्साह दाखवत आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत पणजी केवळ २५ टक्के मतदान झाले होते. म्हापसा व पेडणे विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुक्रमे २८ टक्के मतदान झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघात पहिल्या पाच तासात विक्रमी ३९ टक्के मतदान झालेले आहे.