- किशोर कुबल पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोवा भेट येत्या २७ रोजी निश्चित झाली असून भाजपच्या लोकसभा उमेदवारांसाठी या दिवशी वास्को येथे त्यांची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या सूत्रांनी ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर गोव्यात म्हापसा येथे २४ रोजी जाहीर सभा घेणार होते. परंतु लोकसभेचे दुसय्रा टप्प्यातील मतदान असल्याने त्यांची नियोजित सभा पुढे ढकलण्यात आली आहे.
दक्षिण गोव्यात महिला उमेदवार देऊन भाजपने यावेळी या मतदारसंघात नवा प्रयोग केला आहे. पल्लवी धेंपे या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत तर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या ९५०० मतांनी भाजपला दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ गमवावा लागला होता. या मतदारसंघावर भाजपने जास्त लक्ष केंद्रित केले असून पंतप्रधान मोदी यांच्या दक्षिण गोव्यात जाहीर सभेचे आयोजन हा याचाच एक भाग आहे.