Goa Lok Sabha Election 2024 Result:दक्षिण गोव्यात भाजपने प्रथमच महिला उमेदवार व नवीन चेहरा दिल्याने पल्लवी धेंपे (Pallavi Dempo) तर उत्तर गोव्यात तब्बल सहाव्यांदा रिंगणात उतरून 'डबल हॅटट्रिक' साध्य करू इच्छिणारे श्रीपाद नाईक (Shripad Naik) या दोघांच्याही भवितव्याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून उत्तर गोवा मतदारसंघातून रमाकांत खलप आणि दक्षिण गोवा मतदारसंघातून विरियातो फर्नांडिस (CAPTAIN VIRIATO FERNANDES) यांचे भवितव्य काय, हे लवकरच कळणार आहे.
गोव्यात दक्षिण गोवा मतदारसंघात आणि उत्तर गोवा मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. ताज्या आकडेवारीनुसार, उत्तर गोवा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना ०१ लाख ०५ हजार ८९४ मते मिळाली असून, ४४ हजार ५७५ मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांना ६१ हजार ३१९ मते मिळाली आहेत. रेव्होल्युशरी गोवन पार्टीच्या मनोज परब यांना १९ हजार ८३० मते मिळाली आहे. उत्तर गोवा मतदारसंघात आरजीपी पक्षाला चांगली मते मिळत असून, भाजपासाठी ही डोकेदुखी ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
दक्षिण गोवा मतदारसंघात सुरुवातीपासूनच उमेदवारीवरून भाजपामध्ये अंतर्गत नाराजीनाट्य असल्याचे पाहायला मिळाले. गोवा भाजपाकडून तीन नावे दिल्लीत पाठवण्यात आली होती. मात्र, दक्षिण गोवा मतदारसंघात महिला उमेदवारच देण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरला. अनेक दिवसांच्या विचारविनिमयानंतर पल्लवी धेंपो यांना उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोवा मतदारसंघातील प्रचार, सभा यांवर भर दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या सुरुवातीच्या कलांनुसार, पल्लवी धेंपो पिछाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस पुढे असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांना ९९ हजार १०९ मते मिळाली असून, ७ हजार ७२४ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपाच्या पल्लवी धेंपो यांना ९१ हजार ३८५ मते मिळाली आहेत. यामुळे भाजपाच्या गोटातील धाकधूक वाढली आहे. अद्याप मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागतो, याकडे भाजपा आणि काँग्रेसचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दक्षिण गोवा मतदारसंघातून आरजीपी पक्षाकडून रुबर्ट परेरा यांना उमेदवारी दिली होती. रुबर्ट परेरा यांना ८ हजार ९६२ मते मिळाली आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात प्रथमच भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी नवीन चेहरे दिले. भाजपने तर महिला उमेदवार देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली. काँग्रेसने इंडिया आघाडीसाठी दिलेला उमेदवार विरियातो फर्नांडिस सासष्टी तालुक्यात किती मते मिळवतो यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे.