सूरज पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: दक्षिण गोव्यातील सायलंट मतदारच शेवटी भाजपला भोवले. जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार, संघटनात्मक काम, कार्यकर्ते ही जमेची बाजू होती. उमेदवार नवखा असला तरी प्रचारकार्यात भाजपने आघाडी घेतली होती. भाजपने हा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा करून ठेवला होता. पल्लवी धेपेच जिंकणार अशी हवाही होती. तरीही येथील मतदारांनी भाजपला इंगा दाखवत कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना निवडून आणले.
जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांत भाजपने आघाडी घेतली खरी. मात्र, ही आघाडी विजयाचे दार उघडण्यासाठी मदतरूपी ठरली नाही. हिंदुबहुल्य मतदारसंघ भाजपसाठी आशा होती. सासष्टीत काँग्रेसने मताधिक्य घेतले तरी आम्ही अन्य हिंदुबहुसंख्य मतदारसंघात भरघोस मताधिक्य घेऊन जिंकून येऊ, असे भाजपलाही वाटत होते. मात्र, त्या मतदारसंघात काँग्रेसनेही मते मिळविली. एरवी त्या मतदारसंघात काँग्रेसचे आमदारही नाहीत व संघटनात्मक शक्तीही खिळखिळी आहे. एवढे असून मतदारसंघातील मतदार काँग्रेसच्या बाजूने राहिला. त्याची कारणमीमांसा आता भाजपला करावीच लागणार आहे.
भाजपला मिळालेली मते
दक्षिण गोव्यातील फोंड्यात भाजपला ४१५६, शिरोडा ४८८५, मडकई १०,७७८, मुरगाव २०६५, वास्को ३२३१, दाबोळी २७२४, कुडचडे १६९७, सावर्डे ९५११, सांगे ५३२०, तर काणकोणात ७१३२ मताधिक्य मिळाले.
'हाता'ला साथ
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ हा आतापर्यंत काँग्रेसच्याच बाजूने राहिला आहे हा इतिहास आहे. फक्त दोनदा या मतदारसंघात कमळ फुलले होते. रमाकांत आंगले व नरेंद्र सावईकर हे भाजपचे उमेदवार यापूर्वी या मतदारसंघात खासदार बनले होते, अन्यथा नेहमीच या तालुक्याने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाच हात दिला.