Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडून दक्षिण गोवा उमेदवार आज शुक्रवारी जाहीर होणार आहे.
'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी धंपे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. काल भाजपने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. परंतु, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा त्यात समावेश नव्हता. तामिळनाडूत ९ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
दक्षिण गोव्यात उमेदवारी धेंपे उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची पत्नी पल्लवी यांना की, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांना याबाबत वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. गोव्यात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी आहे. त्यामुळे प्रचारासाठी पुरेसे दिवस मिळतात, असे भाजपचे स्थानिक नेते सांगत आहेत.
दरम्यान, गुरुवारी काँग्रेसनेही तिसरी यादी जाहीर केली. परंतु गोव्यातील दोन पैकी एकाही जागेचा यात समावेश नाही.
चौथ्या यादीत नाव : तानावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, भाजप उमेदवारांची चौथी यादी आज, शुक्रवारी जाहीर करणार आहे, त्यात दक्षिण गोव्याच्या उमेदवाराचा समावेश असेल. पक्षाने प्रत्यक्ष फिल्डवर आपले काम चालूच ठेवले आहे. आजही मी उत्तर आणि दक्षिण दोन्ही मतदारसंघांमधील कामाचा आढावा घेतला.