लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभा निवडणूक प्रचारावेळी युवा वर्ग नोकऱ्यांबाबत जाब विचारताना दिसत आहे. नोकऱ्या कधी देणार ते सांगा? असे प्रश्न हमखास सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना असतातच. शिवाय विरोधी पक्षाच्या उमेदवारांनाही तुम्ही नोकऱ्या मिळवून देण्यासाठी काय करणार ते सांगा, असेही विचारले जाते.
आयुष इस्पितळ, मोपा विमानतळ तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारी गोवा शिपयार्ड, एमपीटी, टपाल खाते, दूरसंचार व इतर आस्थापनांबरोबरच गोवा सरकारनेही आपल्या विविध खात्यांमध्ये युवक, युवतींना नोकऱ्यांत डावलल्याची भावना युवा वर्गामध्ये आहे.
पेडणे, डिचोली, मुरगाव तालुक्यांमध्ये याचा प्रत्यय उमेदवार, मंत्री, आमदारांना आला. आजकाल प्रत्येकाला सरकारी नोकरी शाश्वतीची वाटते. राज्य सरकारनेही गेला बराच काळ तशी मोठ्या प्रमाणात भरती केलेली नाही. आता सरकारी भरती राज्यात कर्मचारी भरती निवड आयोगामार्फत होणार आहे. आचारसंहितेमुळे भरती रखडलेली आहे. राज्यातील उच्चशिक्षित युवावर्ग बेरोजगार आहे. देशात गोवा राज्य हे बेरोजगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, याकडे काही युवक मंत्र्यांकडे संतप्त स्वरात तक्रार करतात.
सत्ताधारी पक्षाने 'हर घर ग्रॅजुएट'चा नारा लावला आहे. प्रत्यक्षात राज्यात 'हर घर बेकार' अशी स्थिती असल्याची टीका विरोधक करीत आहेत. आरजी पक्षाने यावर आवाज उठवला होता. राज्यात उच्चशिक्षित युवा नोकऱ्यांसाठी तसेच उद्योग उभारण्यासाठी संघर्ष करीत आहेत. 'हर घर ग्रॅजुएट'सारखे स्टंट करून युवकांच्या भविष्याशी खेळू नये, असे युवकांचे म्हणणे आहे.
नोकऱ्यांवर तक्रार
आरजीचे उमेदवार मनोज परब व रॉबर्ट परेरा प्रचारासाठी जातात तेव्हा त्यांच्यासमोर तरुण वर्ग नोकऱ्या परप्रांतीयांना दिल्या जात असल्याची तक्रार करतात. पोलिस भरतीच्या यादीमध्ये अशा अनेक परप्रांतीयांना नोकऱ्याा देण्यात आल्याची तक्रार काही ठिकाणी परब यांच्याकडे करण्यात आली. 'पोगो' विधेयक विधानसभेत पाठपुरावा करून संमत करून घेतले जावे, अशी मागणीही आरजीच्या उमेदवारांकडे केली जाते.
विरियातो उत्तरे देण्यात पटाईत
दक्षिण गोव्यात विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन हे काही आता उमेदवार नाहीत. परंतु, विरियातो फर्नाडिस यांना युवक प्रश्न विचारतात व विरियातो सराईतपणे उत्तरे देतात. सार्दिन असते तर त्यांना युवा वर्गाला तोंड देणे कठीण झाले असते.
मंत्री, आमदारांना बैठकीत प्रश्न
दरम्यान, काही मंत्री तसेच सत्ताधारी आमदार प्रचाराच्या वेळी युवा वर्ग नोकऱ्याबद्दल विचारतात हे खासगीत बोलताना मान्य करतात. यापुढे आम्ही नोकऱ्या देणार, असे सांगून मंत्री वेळ मारून नेतात. आचारसंहिता उठल्यानंतर प्राधान्यक्रमे सरकारने रखडलेली भरती मार्गी लावावी लागणार आहे.
म्हापसा अर्बनचा प्रश्न
काँग्रेसचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांना उत्तर गोव्यातील काही भागांमध्ये भाजपचे कार्यकर्ते म्हापसा अर्बन बँकेविषयी प्रश्न विचारताना आढळून येते.