Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले असून काँग्रेसला उमेदवार जाहीर करण्यास विलंब का होतो, याचे स्पष्टीकरण त्यांनी मतदारांना द्यावे, असे आवाहन भाजपने केले आहे.
म्हापशातील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून ही मागणी पक्षाचे प्रवक्ता गिरीराज पै वेर्णेकर यांनी केली आहे. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष तसेच प्रवक्ता ग्लेन टिकलो, कार्यकारिणीचे सहासचिव राजसिंग राणे उपस्थित होते.
ज्या पद्धतीने भाजपने महिला उमेदवार देऊन महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे, त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षानेसुद्धा गोव्यातून महिला उमेदवार रिंगणात उतरावा, असे आवाहन वेर्णेकर यांनी केले. महिला उमेदवार देण्याचे धाडस काँग्रेस दाखवेल का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला. उत्तर गोव्यातून काँग्रेसला रिंगणात उतरवण्यासाठी आज उमेदवार का मिळत नाही, असाही प्रश्न त्यांनी केला.
खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची उमेदवारी पक्षाकडून अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. याचा अर्थ सार्दिन हे खासदार म्हणून अपयशी ठरले आहेत का ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.