समीर नाईक, पणजी: आल्तीनो येथील पॉलिटेकनिक महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीची उत्तर गोव्याची मतमोजणी मंगळवारी पार पडली. परंतु मतमोजणी सुरू होताच पावसाने हजेरी लावली त्यामुळे या ठिकाणी सकाळी ११ वाजेपर्यंत तरी कुठल्याच पक्षाचे समर्थक झळकले देखील नाही. त्यामुळे एरवी मतमोजणीवेळी होणारी समर्थकांची गर्दी यंदा मात्र पाहायला मिळाली नाही.
सकाळी ८ वाजल्यापासून पणजीत पावसाने हजेरी लावली, यातून अनेक जणांनी घरीच राहणे पसंद केले. तसेच मंगळवार पासूनच राज्यातील शाळा सुरू झाल्या, हेही निकाल असलेल्या ठिकाणी गर्दी न होण्याचे प्रमुख कारण ठरले. पाऊस १०.३० च्या सुमारास बंद झाल्याने, आणि भाजपचे श्रीपाद नाईक यांनी मोठी आघाडी घेतल्याचे वृत्त कळताच नंतर हळूहळू निकाल ठिकाणी भाजप समर्थकांनी गर्दी केली. श्रीपाद नाईक यांनी देखील समर्थकांची भेट घेत, त्यांच्याशी संवाद साधला. पण तरीही मागच्या वेळी जो उत्साह दिसून आला, तो मात्र यंदा कुठेच दिसला नाही.
पोलिसांचा कडक बंदोबस्त-
आल्तीनो भागात मतमोजणी ठीकण्याचा ५०० मीटर पर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला. सकाळी ४ वाजल्यापासून आल्तीनो येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण पावसाचा मारा त्यांना देखील झेलावा लागला. यावेळी अनेक पावसातून वाचण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यानी झाडांची, चात्रेचा आधार घेतला. तर अनेकजण गाडीत आणि जॉगस पार्क मध्ये बसून राहिले. पण तरीही प्रत्येक माणसाची तपासणी करूनच ते प्रवेश देत होते.