दशरथ मांद्रेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: वेळूस येथील सत्यवती च्यारी या वृद्ध महिलेसमोर नियतीने संकटांचा डोंगर उभा केला आहे. त्यांना आधाराची गरज असल्याचे वृत्त मंगळवारी 'लोकमत'मधून प्रसिद्ध होताच पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे सत्यवती यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. च्यारी यांना घर बांधून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
केवळ निर्णय घेऊन आमदार राणे थांबलेल्या नाहीत तर त्यांनी त्याबाबतची कार्यवाहीसुद्धा सुरू केली आहे. आज, बुधवारपासून या कामाला सुरुवात होईल. सत्यवती यांनी जीवनात अनेक यातना भोगल्या. त्यांचे घर कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यांचा धाकट्या मुलाचे आजारपणाने निधन झाले. त्यानंतर काही महिन्यांतच मोठ्या मुलाचेही आजाराने निधन झाले. त्यामुळे च्यारी कुटुंबात सत्यवती, त्यांची सून व नातू असा परिवार राहिला. त्यानंतर दुःखाचा आणखी एक डोंगर च्यारी कुटुंबावर कोसळला, एका अपघातात नातवाचाही मृत्यू झाला.
सध्या या कुटुंबात कमवते कोणीच . त्यातच त्यांचे घर नाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. पावसाळा जवळ आल्याने घराची दुरुस्ती कशी करायची? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासाठी त्यांनी मदतीची हाक दिली होती. आमदार दिव्या राणे यांनी ही जबाबदारी उचलली आहे. सत्यवती यांना पावसाळ्यापूर्वी निवारा मिळणार आहे. याबाबत प्रभागाचे नगरसेवक रामदास शिरोडकर यांनी सांगितले की, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार दिव्या राणे यांच्या सत्यवती यांना घर बांधून देण्याच्या निर्णय घेतला. आता लगेच कामाला सुरुवात होईल.
मानले 'लोकमत'चे आभार
समाजात अशी अनेक गरीब कुटुंबे आहेत. मात्र, त्यांची माहिती आमच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही. सत्यवती च्यारी यांची परिस्थिती बिकट आहे. याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध आले ही चांगली गोष्ट झाली, असे आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले. सत्यवती यांच्या घराच्या बांधकामाला बुधवारपासून सुरुवात केली जाईल, असे सांगत त्यांनी दैनिक लोकमत'चे आभार मानले.
मदतीला धावल्या
आमदार दिव्या राणे या आपले घर बांधून देत आहे ही माहिती मिळताच भाभी माझ्या मदतीला आल्या' अशी प्रतिक्रिया सत्यवती च्यारी यांनी व्यक्त केली. अडचणीत असूनही फोणीच आपल्याला मदत करत नाही म्हणून सत्यवती चिंताग्रस्त होत्या, मात्र, आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.