-समीर नाईकपणजी - रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या संयुक्ता काळे हिने वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. राही पाखले हिनेही ट्रॅम्पोलिन प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याने या प्रकारावर महाराष्ट्राचे वर्चस्व राहिले. पेडे इनडोअर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक प्रकारात महाराष्ट्राने शुक्रवारी देखील दमदार खेळ दाखवला.
रिदमिक सांघिक व सर्वसाधारण सुवर्ण जिंकलेल्या संयुक्ता हिने हूप प्रकारात २६.४५ गुणांसह सुवर्ण जिंकले. तिची सहकारी निश्का काळे हिने २३.४५ गुणांसह रौप्य पदक पटकवत महाराष्ट्राला पहिली दोन्ही स्थाने मिळवून दिली. हरियाणाच्या लाईफ अदलखा हिने २३.३५ गुणांसह कांस्य पदक जिंकले. यानंतर महाराष्ट्राने अजून एक सुवर्ण व रौप्य पदक आपल्या खात्यात जमा केले.
राही पाखले हिने महिलांच्या ट्रॅम्पोलिन प्रकारात ४३.८८ गुणांसह सुवर्ण मिळविले. सेजल जाधवने ४१.२० गुण घेत महाराष्ट्राला रौप्य मिळवून दिले. केरळच्या अन्विता सचिन हिने ४०.७० गुणांसह कांस्य मिळविले.
गोव्याच्या स्नेहा महाजनला चौथे स्थान गुरुवारी झालेल्या रिदमीक जिमनॅस्टीक वैयक्तिक ऑल राऊंड फायनलमध्येही महाराष्ट्रच्या संयुक्ता काळे हीने ९६.४० गुणांसह सुवर्ण पदक प्राप्त केले. हरियाणाच्या लाईफ अदलखा, व महाराष्ट्राच्या निश्का काळे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला. या गटात गोव्याने चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. गोव्याच्या स्नेहा महाजन हीने ७१.१५ गुण मिळवित चौथेे स्थान प्राप्त केले.