सदगुरू पाटील
पणजी - स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची तुलना विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी होऊ शकत नाही. पण दोघांमध्येही काही साम्यस्थळे आहेत. तसेच दोघांमध्ये काही विसंगतीही आहेत. सावंत यांना पर्रीकर यांच्याप्रमाणे कामाचा ठसा उमटविण्यासाठी काही काळ जावा लागेल.
सावंत यांनी मंगळवारी सचिवालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाच्या केबिनचा ताबा घेतला. मात्र पर्रीकर ज्या खुर्चीवर बसत होते, त्या खुर्चीवर मुख्यमंत्री सावंत बसले नाहीत. पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असताना जी प्रमुख खुर्ची वापरत असे, ती खुर्ची आपल्याच बाजूला ठेवत सावंत हे नव्या खुर्चीवर बसले. पर्रीकरांच्या त्या खुर्चीवर सावंत यांनी पर्रीकरांचा फोटो ठेवला आहे. आपण पर्रीकर यांच्या खुर्चीवर बसण्याएवढी पात्रता अजून प्राप्त केलेली नाही, अशी भूमिका सावंत यांनी घेतली आहे.
पर्रीकर हे 2000 साली सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा त्यांचेही वय 45 होते आणि सावंत यांचेही वय आता 45 आहे. मात्र पर्रीकर प्रथम सीएम झाले तेव्हा जेवढे तरुण दिसायचे, त्यापेक्षा जास्त तरुण सावंत हे दिसत आहेत. पर्रीकर हे आयआयटी पदवीधर तर सावंत हे आर्युवेदिक डॉक्टर आहेत. पर्रीकर यांनी कधी सरकारी नोकरी केली नाही पण सावंत यांनी प्रारंभी आर्युवेदिक डॉक्टर म्हणून सरकारी नोकरी केली. विश्वजित राणे 2018 सालीही आरोग्य मंत्री होते तेव्हाच सावंत यांनी सरकारी नोकरी सोडली.
पर्रीकर हे आमदार व विरोधी पक्षनेते होते मग थेट मुख्यमंत्री झाले. सावंत हे आमदार व सभापती झाले व थेट मुख्यमंत्री बनले. पर्रीकर यांनी प्रथम मंत्रीपदाचा अनुभव घेतला नव्हता, तसाच सावंत यांनाही तो अनुभव घेता आला नाही. पर्रीकर प्रथम सीएम झाले तेव्हाही आघाडी सरकार होते. त्यांना इतर आमदारांवर अवलंबून रहावे लागले होते. सावंत यांचीही आजची स्थिती तिच आहे. सावंत हे गोवाभाजपाचे तिसरे मुख्यमंत्री आहेत. पर्रीकर यांच्यापूर्वी पणजीच्या कुठच्याच आमदाराला कधी मुख्यमंत्रीपद मिळाले नव्हते. सावंत यांच्यापूर्वी साखळी (किंवा पाळी) मतदारसंघाच्या कुठच्याच आमदाराला कधी मुख्यमंत्रीपद मिळाले नाही.
पर्रीकरांच्या मंत्रिमंडळात दिगंबर कामत, रमाकांत खलप, रवी नाईक आदी ज्येष्ठांनी काम केले. आज सावंत यांच्या मंत्रिमंडळात सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, विश्वजित राणे आदी काही वजनदार व काही उपद्रवी मंत्री आहेत. पर्रीकर यांचे भाजपावर प्रभुत्व होते. त्यामुळे गोवा भाजपामधील कुणीच पर्रीकर यांच्यावर कधी हुकूमत गाजवू शकत नव्हते. सावंत यांची स्थिती तशी नाही. त्यांना संघटन मंत्री सतिश धोंड यांचे नियंत्रण स्वीकारावे लागेल. पर्रीकर यांनी सरकार सांभाळतानाच भाजपचेही काम पुढे नेले. सावंत हेही भाजपा पक्ष संघटनेचे काम पुढे नेऊ शकतील. पर्रीकर सीएम असताना आल्तिनोच्या महालक्ष्मी बंगल्यातून त्यांनी काम केले पण ते कधीच रात्रीच्यावेळी या बंगल्यात राहिले नाहीत. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही या बंगल्यात मुक्काम न ठोकता त्यांच्या मांद्रे मतदारसंघातच रात्रीच्यावेळी राहावे, जेणेकरून त्यांचा मतदारसंघाशी पूर्ण संपर्क राहिल असे भाजपाला अपेक्षित होते. मात्र पार्सेकर ते ऐकले नाहीत. सावंत यांचा साखळी मतदारसंघ पणजीपासून थोडा दूर असल्याने सावंत यांनाही कदाचित रोज साखळीहून पणजीत यावे लागेल. महालक्ष्मी बंगल्यावर कदाचित ते कायमस्वरुपी पद्धतीने राहू पाहणार नाहीत.