मनोहर पर्रीकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पणजीत उसळलेली गर्दी, लागलेली प्रचंड रांग आणि देशभर तयार झालेले शोकाचे वातावरण आजदेखील आठवते. १७ मार्च २०१९ रोजी पर्रीकर यांनी डोळे कायमचे मिटले आणि गोव्यात लाखो समर्थकांचे डोळे पाणावले. मृत्यूसमयी पर्रीकर संरक्षणमंत्रिपदी नव्हते. ते छोट्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी होते, पण एखादा अत्यंत प्रभावी विद्यमान केंद्रीय मंत्रीच मरण पावला, अशा प्रकारचे वातावरण देशातील विविध राज्यांमध्ये तयार झाले होते.
स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या निधनावेळी पणजीत महासागर लोटला होता, असे जुन्या काळातील लोक सांगतात. त्यानंतरची सर्वात मोठी गर्दी ही पर्रीकर यांच्या मृत्यूसमयी झाली होती. पंतप्रधानांसह अनेय केंद्रीय नेतेही गोव्यात दाखल झाले होते. पर्रीकर यांच्या जाण्याने गोव्याचे नुकसान झाले हे मान्य करावे लागेल. परवा सोशल मीडियावर एक महत्त्वाची प्रतिक्रिया आली. बार्देश तालुक्यातील महत्त्वाच्या भागात नळ कोरडे. पर्वरी, साळगावसह अनेक गावांत पाणीच नाही. पर्रीकर असते तर धावपळ करून पाण्याची व्यवस्था केली असती. ही प्रतिक्रिया खूप बोलकी होती, कोविड संकट काळात पर्रीकर नव्हते. ऑक्सिजनअभावी गोव्यात शेकडो रुग्णांचे प्राण गेले.
पर्रीकर असते तर असे झाले नसते, ही त्यावेळची प्रतिक्रिया होती. पर्रीकर चौथ्यांदा सीएम बनले तेव्हा त्यांनी फिरविलेले काही निर्णय टीकेचा विषय झाले तरी त्यांची कार्यक्षमता, नेतृत्व गुण, प्रशासनावरील नियंत्रण, अधिकाऱ्यांमध्ये असलेला धाक याला तोड नव्हती. विद्यमान सरकारही कार्यक्षमता दाखवत आहे, पण पर्रीकर यांच्यासारख्या नेत्याने गोव्याला जलदगतीने विकासाच्या मुख्य धारेत नेऊन ठेवले होते, हे लक्षात घ्यावे लागेल. अजूनदेखील ज्या कल्याणकारी योजनांचा गवगवा होतो, त्या योजना पर्रीकर यांनीच सुरू केल्या होत्या. पर्रीकर यांच्या काळात सरकारी नोकऱ्या विकल्या जात नव्हत्या. बांधकाम खात्यात दोनवेळा (दीपक पाऊसकर असताना एकदा) नोकरभरती घोळ झाला, तसा घोळ पर्रीकरांच्यावेळी होत नव्हता. नोकरभरतीसाठी एखाद्या कार्यकर्त्याने पैसे घेतल्याचे आढळले तर थेट बैठकीत तिखट बोलून पर्रीकर ते पैसे नेऊन परत कर असा आदेशच द्यायचे. त्यावेळी रामराज्य होते अशातला भाग नाही, पण पर्रीकर गेल्यानंतर काहीजणांनी जसे विटवले, तेवढी दुर्दशेची स्थिती तेव्हा नव्हती.
आता बँकांमध्ये खेपा मारणारे व घामाघूम होणारे ज्येष्ठ नागरिक, लाडलीच्या प्रतीक्षेतील युवती किंवा 'गृहआधार'चा केवळ आधार असलेल्या विधवा महिला नाराजीने सांगतात की बँकेत पैसेच आले नाहीत. भाई असते तर असे घडले नसते, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया येते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजी शहर नेऊन राज्यकर्त्यांनी खड्यात घातले. व्यापारी, दुकानदारांसह सर्वांचेच नुकसान झाले. पर्रीकर असते तर काहीजण तरी एव्हाना पणजीच्या दुर्दशेचे दोषी म्हणून तुरुंगात गेले असते. दुसरा पर्रीकर निर्माण होईपर्यंत प्रतीक्षा करूया. पर्रीकर यांनी ज्या योजना सुरू केल्या, त्या अधिक प्रभावीपणे अमलात आणण्याचे काम सावंत सरकारने करायला हवे. गृह आधार योजनेचा लाभ गरजू महिलांना दर महिन्याला मिळायला हवा. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या पैशांसाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागू नये. लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभासाठी युवती अर्ज करतात. मात्र लग्न झाले, मूल झाले तरी, योजनेचा लाभ मिळत नाही.
पर्रीकर यांना कधीच तीस-बत्तीस आमदारांचे पाठबळ मिळाले नव्हते. विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांना ते मिळाले आहे. ३३ आमदार आज सरकारसोबत आहे. त्यामुळे खरे म्हणजे सध्याच्या सरकारने जनमानसावर कायमचा ठसा उमटेल अशा योजना आणायला हव्यात. तिसरा मांडवी पूल आणि अन्य साधनसुविधा उभ्या केल्या म्हणून पर्रीकर यांचे नाव घेतले जाते. पर्रीकर सीएम असताना भाजप कोअर टीमच्या बैठका सातत्याने होत होत्या. आता त्या होतच नाहीत. त्यामुळे भाजप संघटना व विद्यमान सरकारमध्ये समन्वय नाही. पर्रीकर यांना तिसऱ्या जयंतीदिनी सामान्य गोंयकाराच्यावतीने विनम्र श्रद्धांजली.