- समीर नाईक पणजी - ताळगाव पंचायतच्या सरपंचपदी मारिया फर्नांडीस यांची सोमवारी निवड झाली. तर सागर बांदेकर यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी संदेश नाईक यांनी केली. दरम्यान माजी सरपंच जानू रोसारिओ यांनी आपली सूत्रे मारिया फर्नांडिस यांच्याकडे सुपूर्द केली.
ताळगाव सरपंचपदी मारीया फर्नांडिस, उपसरपंचपदी सागर बांदेकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी यापूर्वीच दिली होती. केवळ याबाबतची अधिकृत घोषणा करणे बाकी होते. सोमवारी निवडणूक अधिकारी संदेश नाईक सर्व नवीन निवडून आलेल्या उमेदवारांनी सरपंच आणि उपसरपंचाच्या मंतांच्या आधारे ही घोषणा केली. यावेळी नवीन पंच सदस्य आणि माजी पंच सदस्य उपस्थित होते.
मंत्री बाबुश मोन्सेरात यांनीच पाठिंबा दिलेल्या ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटचे सर्व उमेदवार जिंकून आल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचपदी कोण असणार? याचीच चर्चा होती. पण आता ताळगावला नवे सरपंच आणि उपसरपंच मिळाल्याने अनेक प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे.
मारिया फर्नांडिस या गेल्या टर्ममध्ये प्रभाग क्रमांक ८ मधून पंच सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी देखील बाबुश मोंसेरात यांनी मारिया फर्नांडिस यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली होती, आणि आता सरपंचपदी त्यांना विराजमान केले. तर पहिल्यांदाच पंच बनलेल्या सागर बांदेकर यांना उपसरपंचपद बहाल करत, त्यांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे.