देशात कोरोना महामारीच्या संकटात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीव जात आहेत. गोव्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये काल मध्यरात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. (goa medical college hospital death due to low oxygen level corona patient)
गेल्या काही दिवसांत याच रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यातूनच स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठं संकट उभं राहिलं आहे. मंगळवारी २६, बुधवारी २०, गुरुवारी १५ आणि आज १३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गोवा सरकारनं मेडिकल कॉलेजमधील ऑक्सिजन पुरवठ्याच्या प्रश्नावर समितीची नियुक्ती केली आहे. यात आयआयटीचे बीके मिश्रा, जीएमसीचे माजी अधिष्ठाते व्ही.एन.जिंदर आणि तारिक थॉमस यांचा समावेश आहे.
रुग्णालयांना केल्या जाणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली आहे. याशिवाय समोर येणाऱ्या अडचणींवर तातडीनं तोडगा काढण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवसांत समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ऑक्सिजनच्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. याआधी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये नागरिक ऑक्सिजनसाठी खूप भटकत होते. पण आता काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली आहे.