पणजी - तुमची स्वत:ची मुलगी असती तर नेली असते का मंत्र्यांकडे ? असा खडा सवाल गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी गोमेकॉचे डीन डॉ प्रदीप नाईक यांना सोमवारी घेराव घालून विचारला. आमदाराचे न ऐकल्यामुळे मंत्र्यांच्या कार्यालयात नेऊन लेखी चूक मागायला लावण्याच्या प्रकरणात निवासी डॉक्टर संतप्त झाले आहेत. आमदाराला वेळेवर माहिती न दिल्यामुळे आमदाराने मंत्र्याकडे तक्रार केली व मंत्र्याने त्या महिला डॉक्टरला आपल्या कार्यालयात घेऊन येण्याची सूचना गॉमेकॉचे डीन प्रदीप नाईक यांना केली होती व त्याप्रमाणे अधिकृत आदेश न देता त्या महिला डॉक्टरला मंत्र्यांच्या खाजगी कार्यालयात घेऊन गेले होते आणि तिथे तिला लेखी चूक मागायला लावली होती. या घटनेचे वृत्त लोकमतमधून प्रसिद्ध झाल्यानंतर निवासी डॉक्टरांकडून त्याची तत्काळ दखल घेताना सोमवारी सकाळी डीनच्या कार्यालयाला घेराव घातला. त्यावेळी संतापलेल्या डॉक्टरांनी हा प्रश्न डीन नाईक यांना केला. संतापलेल्या डॉक्टरच्या प्रश्नांच्या बडिमारामुळे निरुत्तर झालेले डीन नाईक यांच्यापुढे माफी मागण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी घटनेबद्दल माफी मागितली. यापुढे असे घडू देणार नाही असे आश्वासनही त्यांना दिले. त्याच बरोबर गोमेकॉच्या मेडीसीन विभागाच्या डॉक्टरच्या बाबतीत हे घडल्यामुळे विभाग प्रमुख एडवीन गोम्स यांनीही माफी मागितली अशी माहिती गोमेकॉच्या निवासी डॉक्टरकडून ही माहिती देण्यात आली.
डॉक्टरच्या निलंबनाचा आदेश?ज्या महिला डॉक्टरची आमदाराने तक्रार केली होती व तिने न केलेल्या चुकीबद्दल लेखी माफी मागूनही हे प्रकरण थांबलेले नाही. तिच्या निलंबनाचा आदेश निघाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. डॉक्टरांच्या मोर्चानंतर हा आदेश स्थगित ठेवण्यात आला आहे. अद्याप त्या डॉक्टरला देण्यात आलेला नाही.