पणजी - खाण प्रकरणांतील खटले लवकर निकालात काढण्यासाठी सरकारने विशेष जलदगती सत्र न्यायालयाची स्थापना केलेली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नांडीस ही प्रकरणे हाताळणार असून राज्यातील सर्व खाण घोटाळा प्रकरणे याच न्यायालयात होणार आहेत. खनिज घोटाळा हा न्यायालयीन प्रक्रियेत अधिक काळ खोळंबून पडू नये यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. हे न्यायालय मडगावला असणार असून केवळ खाण घोटाळा प्रकरणातील खटलेच या न्यायालयात चालणार आहेत. दक्षिणेप्रमाणेच उत्तर गोव्यातीलही प्रकरणांतही याच न्यायालयात सुनावण्या होतील. खाण घोटाळ्यातील आरोपपत्रे या न्यायालयात दाखल केली तर जातीलच, परंतु तपासा दरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयिताच्या जामीन अर्जावरील सुनावण्याही याच न्यायालयात होणार आहेत. असे खाण व भुगर्भ खात्याच्या शिफारशींनंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या नावाने जारी केलेल्या आदेशत म्हटले आहे. खाण घोटाळ्यातील काही प्रकरणात यापूर्वी उत्तर गोवा व दक्षीण गोव्यातील सत्र न्यायालयात आरोपपत्रे दाखल झालेली आहेत आणि सुनावण्याही सुरू झालेल्या आहेत. ही सर्व प्रकरणे या विशेष जलदगती न्यायालयात नेली जातील अशी माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली. खाण घोटाळा प्रकरणात करण्यात आलेली कोट्यवदी रुपयांची लूट लवकर वसुली करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु न्यायालयात अनेक प्रकरणे पडून असल्यामुळे खाण घोटाळ््याची प्रकरणे लढविणे हे वेळकाढू ठरले असते. आता जलद न्यायालय स्थापना करण्यात आल्यामुळे या प्रकरणात जलग गतीने सुनावण्या होणार आहेत. त्यामुळे खटले लवकर निकालात काढणे शक्य होणार आहे. काही प्रकरणात अद्याप आरोपपत्रे दाखल करण्यात आलेली नाहीत. ही आरोपपत्रे एसआयटीला लवकर सादर करावी लागणार आहेत.
गोवा खाण घोटाळ्यातील सुनावण्या होणार जलदगती न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 7:34 PM