मडगाव: गोव्यातील बंद असलेल्या खाण व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करताना हा व्यवसाय पुन्हा सुरु व्हावा यासाठी तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले आहे. न्यायिक प्रक्रियेच्या माध्यमातून खाण प्रश्नावर तोडगा काढू, केंद्र सरकार व राज्य सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे खाण व्यवसाय बंदीचे संकट निर्माण झाले आहे. यावर उपाययोजना काढू . या क्षेत्रतील जाणकारांकडे चर्चा करुन गरिबांची रोजीरोटी कशी वाचविता येईल यावर चर्चा केली जाईल,असेही मोदी म्हणाले.
खाण व्यवसाय व त्यावर अवलंबून असलेल्या अवलंबिताबददलही त्यांनी सहानुभुती व्यक्त केली. बोर्डा - मडगाव येथे दक्षिण गोव्यातील भाजपा कार्यकत्र्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे सवांद साधला. मल्टीपर्पज मैदानावर त्या निमित्त भव्य मंडपही उभारण्यात आला होता. या मेळाव्याला दक्षिण गोवा जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी 12.30 वाजता या संवाद कार्यक्रमाला प्रारंभ झाला. तो सुमारे दीड ते दोन चालला. मोदी यांनी सुरुवातील गोव्यातील खाण प्रश्नाला हात घातला. त्यावेळी मंडपात हजर असलेल्या भाजपा कार्यकत्र्यानी टाळयांचा गजरात त्यांना दाद दिली.
गोव्यात खाण व्यवसाय हा रोजगार उपलब्ध करुन देणारा व्यवसाय आहे. हा एक महत्त्वाचा व्यवसाय होय. तो सध्या बंद असल्याने सर्वानाच चिंता लागून राहिली आहे. ते स्वभाविकच होय असेही मोदी उदगारले. हा व्यवसाय सुरु करण्यासंबधी वाट शोधून काढू, प्रयत्न करु असेही ते म्हणाले.
शैला पार्सेकर या भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर मोदी म्हणाले. सबका साथ सबका विकास हे आमचे धोरण होय. पूर्वी आपला भारत देशाची गणना पाच कमकुवत अर्थव्यवस्थेमध्ये केली जात होती. आज देशाचा आर्थिक स्तर झपाट्याने वाढत आहे. पूर्वी घोटाळ्यांची चर्चा होत होती ती हेडलाईन ठरत असे, आज नवीन योजनांची चर्चा होत आहे. हा बदल घडला आहे. घोटाळ्यातून बाहेर काढून योजनेच्या माध्यमातून आम्ही आगेकूच करु लागले आहे. माओवादी प्रभावित जिल्ह्यांची संख्या कमी होत आहे. जनता व जवानांच्या सहकार्याने हे होउ लागले आहे. पराभवाचे रुपांतर विजयात करा. पाच वर्षात बदल घडला आहे.देशात पूर्वी शौचालये नव्हती. आज 9 कोटीहून अधिक शौचालये आहेत. विकासांचा दरही वाढू लागला आहे. पाच वर्षात कामे करुन देशात बदल घडवून आणलेला आहे, असे त्यांनी सांगितले
कार्यकर्ते हीच पक्षाचे बलस्थान आहे.त्याग व समर्पित वृत्ती म्हणजे कार्यकर्ते होय. आपण स्वत संघटन कामात गुंतलो होतो, आता वेळेच्या मर्यादेमुळे आपण या कामाला मुकत आहे असेही मोदी म्हणाले. आमचा पक्ष संघटना आधारीत आहे, आम्ही राष्ट्रहितला प्राधान्य देतो हेच आमचे वेगळेपण होय असेही ते म्हणाले. पदाची लालसा नाही, देशाची प्रतिष्ठा हीच आमची प्रेरणा होय, कार्यकर्त्यांची निष्ठा आहे. दलाल नव्हे असे सांगताना कधीकाळी दोन संख्येवर असलेल्या आमच्या खासदारांचा आकडा 282 इतका झाला. कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झाले असे ते म्हणाले.
अल्पावधीत हा मेळावा यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल मोदी यांनी खासदार नरेंद्र सावईकर यांचेही कौतुक केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गोव्याचा आधुनिक शिल्पकार असे संबोधताना त्यांचे आरोग्य चांगले राहू अशा शुभेच्छा दिल्या. आपला बुथ हा सर्वात मजबूत असायला हवा. हीच भावना ठेवून कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे. नमो अॅपच्या माध्यमातून प्रश्न मांडा असे आवाहनही त्यांनी केले. विदयार्थीना परीक्षेचा तणाव जाणवत आहे का यावर आपण विदयार्थ्यांशीही संवाद साधणार आहे, त्यादिवशी आम्ही सर्वजण पुन्हा एकत्र येउया असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.
दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी मोदी यांचे स्वागत केले. दक्षिण गोवा मतदारसंघात 20 मतदारसंघ असून, 800 बुथ आहेत. पाच हजाराहून अधिक कार्यकर्ते आहेत अशी माहिती त्यांनी दिली. खासदार सावईकर यांनी आपल्या भाषणात विकासाचे उद्दीष्ट ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केले आहे. निव्वळ आश्वासने दिली नाहीत. जिल्ह्यातील काणकोण तालुक्यात तळपण व गाल्जिबाग नदीवर पुलाचे बांधकाम चालू आहे. मांडवीचा नवीन पुलही पुर्ण होत आहे. अशी कामे करण्यासाठी मोदी यांचे सरकार पाहिजे असे ते म्हणाले.
पंचायतमंत्री माविन गुदीन्हो यांनी सरकारच्या विकासकामावर भाष्य केले. सर्वागिण विकास साधला जात आहे. भाजपाचे लोक एकत्रित आहेत. विरोधक अप्रचार करीत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असतानाही विकासाच्या कामाची पाउले कमी झाली नाही. सदया आघाडी सरकार आहे. राजकीय क्षेत्रात काही ठिकाणी समझोता हा करावा लागतो. सर्वांनाच पाहिजे तसे होत नाही असे सांगताना, भाजपाला दोष देऊ नका असे ते म्हणाले. लोकसभेत गोव्यातून दोन्ही जागांवर भाजपा उमेदवारांना जिंकून आणा, असे आवाहनही त्यांनी केले. माजी आमदार दामोदर नाईक यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तसेच पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.
या मेळाव्याला संपूर्ण दक्षिण गोवा जिल्हयातून भाजपा कार्यकत्र्यानी गर्दी केली होती. महिला कार्यकर्त्यांचीही संख्या लक्षणीय होती. हातात पक्षाचा ङोंडा तसेच नमो नमो गजरांने कार्यकर्त्यांनी मेळावा दणाणून सोडला होता.