पणजी : गोव्यातील खनिज खाण अवलंबितांनी आक्रमक भूमिका घेत भाजपाच्या तिन्ही खासदारांचे राजीनामे मागायला सुरूवात केली. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येत्या 13 जानेवारीला गोवा मायनिंग पिपल्स फ्रंटच्या टीमसोबत बैठक घेण्याचे ठरवले आहे. गोव्याच्या तिन्ही खासदारांच्या उपस्थितीत येत्या 13 जानेवारीला ही बैठक दिल्लीत होणार आहे.
गोवा मायनिंग पिपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांना लोकमतने याविषयी विचारले असता, त्यांनी वृत्तास दुजोरा दिला. आपल्यासह खाण अवलंबितांचे एकूण चार प्रतिनिधी दिल्लीत शहा यांच्यासोबतच्या बैठकीसाठी जातील. वास्तविक आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक हवी आहे. पण शहा यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा आम्ही मोदी यांच्या भेटीबाबतचा विषय त्यांच्यासमोर मांडू शकू. गोव्यातील खनिज खाणी लवकर सुरू केल्या जाव्यात ही आमची मागणी आहे. शहा त्याविषयी काय सांगता ते आम्ही ऐकून तरी घेऊ.
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांना गोव्यातील खनिज खाण अवलंबितांनी लक्ष्य बनविले आहे. कारण गोव्याच्या खाणी सुरू करण्यासाठी केंद्राने केंद्रीय एमएमडीआर कायदाही दुरुस्त केला नाही व पंतप्रधानांची भेट देखील अवलंबितांना अजून मिळालेली नाही.
दिल्लीत खाण अवलंबितांनी तीन दिवस धरणे आंदोलन केले होते पण भाजपचे एकही केंद्रीय नेते त्यावेळी आंदोलकांसमोर आले नाहीत याचीही खंत व राग अनेक अवलंबितांना आहे. गोव्यात खाण अवलंबितांच्या आंदोलनाची धग वाढू लागली आहे. गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या आंदोलनात भाग घेत भाजपवर व भाजपच्या खासदारांवर चौफेर हल्ला चालविला आहे. यामुळे गोव्याच्या खासदारांनी शहा यांना बैठक घेण्याची विनंती केली व त्यांनी ती मान्य केली. तिन्ही खासदार सध्या भाजपच्या राष्ट्रीय मंडळाच्या बैठकीनिमित्ताने दिल्लीत आहेत.