मडगाव: गोव्याचे महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांना राज्याची राजधानी पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरणात आज शुक्रवारी न्यायालयाने दिलासा देताना इयर एंंड पर्यंत न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी अनुपस्थित राहण्याची मुभा दिली. मागच्या सुनावणीच्यावेळी मंत्री मान्सेरात यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने त्यांना या खटल्यात कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची सवलत दयावी अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती अमान्य केली.
या खटल्यातील एक संशयित कांती शिरोडकर यांचे आज शुक्रवारीच निधन झाले आहे. त्याच्या मृत्यूचे डेथ सर्टीफिकेट न्यायालयात सादर करावे असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता २७ ऑक्टोबर रोजी हाेणार आहे. खास न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी सुनावणीच्या वेळी मंत्री मोन्सेरात हे अनुपस्थित होते. त्यांच्या पत्नी तथा ताळगाव मतदारसंघाच्या आमदार जेनिफर मोन्सेरात व अन्य काही संशयित सुनावणीस हजर होते.
या पुर्वीही बाबुश मोन्सेरात व त्यांच्या पत्नी आमदार जेनिफर यांनी खटल्याच्या सुनावणीच्यावेळी कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा दयावी असा अर्ज केला होता. न्यायालयाने त्यावेळी बाबुश यांना ३० सप्टेंबर पर्यंत सुनावणीस गैरहजर राहण्याची सवलत दिली होती. तर जेनिफर यांची मागणी नामंजूर केली होती. २००८ साली ताळगाव मतदारसंघाचे आमदार असताना बाबुश व त्यांच्या साथिदारांनी पणजी पाेलिस ठाण्यात हल्ला चढविताना तोडफोड केल्याचा आरोप आहे. संशयितांचे वकील व सीबीआयचे वकील यावेळी न्यायलयात हजर होते. उपअधिक्षक सुदेश नाईक यांची उर्वरीत उलटतपासणी आज सुनावणीच्या वेळी होउ शकली नाही