लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकऱ्या विक्री प्रकरणामुळे सरकारमध्ये हलकल्लोळ उडाला आहे. असे असले, तरी आरोग्य खात्यात मात्र नोकऱ्यांसाठी कधीही लाचखोरी झालेली नसल्याची भूमिका बहुतांश मंत्री, तसेच सत्ताधारी आमदारांनी घेतली असून, काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.
माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत यांनी राणेंच्या सचोटीचे समर्थन केले. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना विश्वजीत हे माझ्या मंत्रिमंडळात होते. परंतु, त्यावेळी पाच वर्षांच्या काळात विश्वजीत यांच्याबद्दल कधीही नोकरीशी संबंधित लाचखोरीबाबत कोणतीही तक्रार माझ्याकडे आली नाही. विरोधक कोणत्याही आधाराशिवाय आमच्या नेत्यांना विनाकारण लक्ष्य करत आहेत. सरकार गुणवत्तेवर नोकऱ्या देत आहे. मात्र, विरोधक खोटे-नाटे आरोप करून सरकारला बदनाम करू पाहात आहेत असे कामत म्हणाले.
मगोचे नेते व वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावताना असे नमूद केले की, विश्वजीत राणे किंवा त्यांचे वडील प्रतापसिंह राणे हे दोघेही नोकरीसाठी लाच मागतील, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. ते म्हणाले की, विश्वजीत यांनी राज्यभरातील लोकांना सातत्याने मदत केली आहे.
वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे दावे निराधार असल्याचे नमूद करताना राणे यांना पुराव्याशिवाय लक्ष्य बनविले जात असल्याचा आरोप केला. पुरावा म्हणून सादर केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या सत्यतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. पाटकर यांनी एकतर ठोस पुरावे सादर करावेत किंवा निराधार आरोप करणे थांबवावे. विरोधी पक्षात असताना आम्ही ज्या-ज्या वेळी विधाने केली, तेव्हा आमच्या हातात पुरावे होते, असे ते म्हणाले.
आमदार संकल्प आमोणकर म्हणाले की, मी विश्वजीत यांना गेली २५ वर्षे ओळखतो. त्यांनी नोकऱ्या देण्यासाठी पैसे घेतले, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. नोकरी देण्यासाठी त्यांनी कधीही लाच घेतलेली नाही आणि ते घेणारही नाहीत.
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही काँग्रेसने केलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे आरोप जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. शेट्ये म्हणाले, आरोप करणाऱ्यांनी समर्थनार्थ पुरावे द्यावेत.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनीही सरकारच्या पारदर्शक भरतीचे समर्थन केले. ते म्हणाले की, सरकारने केवळ गुणवत्तेवर रिक्त जागा भरल्या. माझ्या मतदारसंघात तसेच विरोधी आमदारांच्या मतदारसंघातही अनेकांना कोणत्याही शिफारशीशिवाय सरकारी नोकऱ्या मिळालेल्या आहेत. इतरांवर खोटे आरोप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
विरोधी आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले की, सरकारी नोकऱ्या पैसे देऊन नव्हे, तर गुणवत्तेवरच मिळायला हव्यात. माझ्या केपे मतदारसंघात अनेकांना गुणवत्तेच्या आधारेच नोकऱ्या मिळालेल्या आहेत. नोकरीसाठी कोणीही कोणालाही पैसे दिलेले नाहीत.