ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 16 - वादग्रस्त ‘एमव्ही लकी सेव्हन’ म्हणजेच मांडवी नदीतील सहावा कसिनो अशी ओळख होत असलेले जहाज हार्बरहून मांडवीत आणले जात असता जोरदार वाऱ्या-पावसामुळे भरकटून मिरामार समुद्रकिनारी अडकले. किनाऱ्यापासून केवळ १00 मीटरवर समुद्रात वाळूच्या पट्ट्यात जहाज अडकले. परिणामी किनाऱ्यावर तेल गळतीचा धोका निर्माण झाला आहे. या कसिनो जहाजावर १७ कर्मचारी होते. पैकी चारजण या दुर्घटनेत जखमी झाले. तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने त्यांची सुटका केली. शनिवारी ही घटना घडली. या घटनेमुळे सरकारी अनास्थेविषयी संताप व्यक्त होत आहे. विरोधी काँग्रेसमध्येही याचे तीव्र पडसाद उमटले. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा विषय गाजण्याची चिन्हे आहेत. हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांच्या गोल्डन ग्लोब कंपनीचा हा कॅसिनो दोन टगच्या साहाय्याने मांडवीत आणला जाताना नदीच्या मुखावर निर्माण झालेल्या वाळूच्या पट्ट्यात अडकला. जोरदार वाऱ्यामुळे तो भरकटत असता वायर रोपने नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले; परंतु ते फोल ठरले. मांडवीच्या मुखाजवळ पाण्याखाली वाळूचे बेट निर्माण झाले आहे. तेथेच हा कसिनो अडकला. बंदर कप्तान खात्याने सहाव्या कॅसिनोला परवानगी नाकारली होती, तरीदेखील सरकारने त्याला परवानगी दिली. मांडवीच्या मुखावर समुद्रात निर्माण झालेले वाळूचे बेट जलवाहतुकीस धोकादायक बनले असल्याचे बंदर कप्तान खात्याने सरकारच्या निदर्शनास आणले होते; परंतु शेवटी हा कसिनो आलाच. या कसिनोवरील जुगार व अन्य उद्योग अजून सुरू झालेले नसल्याने ग्राहक नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. १२ हजार लिटर इंधन या जहाजात तब्बल १२ हजार लिटर इंधन असल्याचे सांगितले जाते. दोन टगच्या साहाय्याने तो मांडवी नदीत आणताना ही घटना घडली. त्यावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात चौघे जखमी झाले; परंतु भरतीमुळे त्यांच्यापर्यंत वैद्यकीय मदत पोहचू शकली नाही. त्यांना हेलिकॉप्टर व पाणबुड्यांच्या मदतीने रविवारी सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. चौघाजणांना वैद्यकीय उपचारार्थ येथील एका खासगी इस्पितळात दाखल केले होते; परंतु नंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. पुढील १५ दिवस तरी अशक्यसमुद्रात अडकून पडलेल्या बोटींची सुटका करणारे माडगावकर साल्वेज कंपनीचे आनंद माडगावकर यांनी, जहाजाच्या कप्तानाची काही चूक नाही. मान्सूनमुळे खराब वातावरण असून जोरदार वारे तसेच भरतीमुळे पुढील १५ दिवस तरी हे जहाज काढणे शक्य नाही, असे सांगितले. अशा स्थितीत ते काढण्याचा प्रयत्न झाल्यास तेल गळतीही होऊ शकते आणि तसे झाल्यास मिरामार ते करंजाळेपर्यंतचा संपूर्ण किनारा काळवंडण्याचा धोका आहे.
गोव्यात मिरामार किनारी जहाज रुतले, चौघे कर्मचारी जखमी
By admin | Published: July 16, 2017 7:17 PM