- निवृत्ती शिरोडकरपेडणे - मालपे येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने शुक्रवारी पहाटे बीड येथून आलेल्या एमएच २३ एस ७९३९ क्रमांकाच्या चारचाकीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही. परंतु, गाडीच्या दर्शनी चक्काचूर झाला आहे.अपघातात माजलगाव (बीड) येथील संकेत (२२), चाटे सुधाकर माऊली (१९), मनीष यादव (२५) व अभिषेक राख (२०) हे चौघेजण गंभीर जखमी झाले. यापैकी संकेत व चाटे सुधाकर माऊली यांना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर मनीष यादव व अभिषेक राख यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या ठिकाणी रात्रीच्या वेळेस कुठल्याच प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्याने या भागात असे वारंवार अपघात होतात. परराज्यातील वाहने या ठिकाणी आल्यानंतर त्यांना रात्री रस्त्याचा अंदाज येत नसल्याने हे अपघात होत असतात. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तसेच रस्ता बांधकाम कंपनीने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली. यापूर्वी येथे अनेक वेळा या ठिकाणी अपघात होऊन अनेकांचे अपघातात बळीही गेले आहेत.
पेडणे पोलिसांना या अपघाताची माहिती मिळतात पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाने अपघाताचा पंचनामा करण्यात आला. तसेच पेडणे अग्निशामक दलाने अपघाताची माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ गाडीतून बाहेर काढले. यामध्ये अग्निशामक दलाचे सहाय्यक अधिकारी सुनील देसाई ,फायटर प्रदीप आसोलकर, शैलेश हळदणकर, यशवंत नाईक, सहदेव परब, धनंजय वस्त व रजत नाईक यांनी हे सहभागी झाले होते. जखमीना १०८ रुग्णवाहिकेने इस्पितळात दाखल केले.