पणजी : गोव्यात मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात आला, तरी देखील ट्रॉलर्स तथा यांत्रिक बोटी समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. यामुळे 70 टक्के ट्रॉलर्स अजूनही मासेमारीसाठी जाऊ शकलेल्या नाहीत. पावसाळा सुरू झाल्यानंतर गोव्यात मासेमारी बंदीचा काळ लागू होत असतो. 31 जुलैर्पयत ही बंदी लागू असते. किना-यावर येऊन या काळात मासे अंडी घालतात. त्यामुळे यांत्रिक बोटींद्वारे मासेमारी केल्यास अंडी नष्ट होण्याचा धोका असते. यामुळे ट्रॉलर्सद्वारे मासेमारी बंद ठेवलेली असते. फक्त छोटय़ा होडय़ांद्वारे काही प्रमाणात मासेमारी होत असते. पावसाळ्य़ात समुद्र जेव्हा रौद्र रुप धारण करतो तेव्हा मच्छीमारांना मासेमारीसाठी जाताही येत नाही.
गोव्यात मासळी उत्पादन वाढलेले आहे. गोव्यात मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात आल्यानंतर प्रचंड प्रमाणात मासळी बाजारात उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती पण अजून हवी तेवढय़ा प्रमाणात मासळी आलेली नाही. कारण फक्त 30 टक्केच ट्रॉलर्स मासेमारीसाठी आतार्पयत समुद्रात जाऊ शकले. मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर आठ दिवसांचा काळ लोटला. ज्यावेळी बंदी लागू असते तेव्हा ट्रॉलर्सवर काम करणारे कामगार आपल्या मूळ घरी गेलेले असतात. ट्रॉलर मालकांकडून ते अगाऊ रक्कम घेऊनच जातात. ओरीसा, झारखंड, तामिळनाडू, केरळ अशा ठिकाणचे मनुष्यबळ गोव्यातील ट्रॉलर्सवर काम करते. गोमंतकीय कामगार केवळ पाच टक्के असतात. आपल्या मूळ गावी गेलेले कामगार अजुनही परतलेले नाहीत असे बहुतेक ट्रॉलर मालकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील अनेक ट्रॉलर्सनी समुद्रात जाण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी जोरदार वारे वाहू लागल्याने हे ट्रॉलर्स रिकाम्या हातानी परत आले. पुढील आठवड्यातच ख-या अर्थाने बहुतांश ट्रॉलर्स समुद्रात जाऊ शकतील.
मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी लोकमतला सांगितले, की बहुतेक ट्रॉलर्स अजून समुद्रात न गेल्यामुळे पुरेशा प्रमाणात मासळी आलेली नाही पण परप्रांतांमधून मासळी येत आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याचे अधिकारी या मासळीची सीमेवर तपासणी करतात व त्यांना ते आत गोव्यात प्रवेश देतात.
दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी सांगितले की, गोव्याच्या सीमेवर पोळे येथे बुधवारी मध्यरात्री 53 मासेवाहू वाहनांची तपासणी करण्यात आली. ही वाहने कर्नाटकमधून आली होती. तिथे माशांचे नमूने तपासले गेले. पत्रदेवी येथे 77 वाहने तपासली गेली. ही मासळीवाहू वाहने महाराष्ट्रातून आले होते. काही मासे हे गोव्यातील कारखान्यांमध्ये जातात.