पणजी : राज्यातील खनिज खाण प्रश्न सुटत नाही, केंद्र सरकार कायदा दुरुस्तीला तयार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाणप्रश्नी भेटीसाठी वेळही देत नाहीत. यामुळे गोवा सरकार, काही मंत्री आणि गोव्यातील खासदारही अस्वस्थ होऊ लागले आहेत असे संकेत मिळतात. खाण अवलंबितांचा आक्रोश व असंतोष वाढू लागला असून भाजपच्या खासदारांवर लपून राहण्याची वेळ येऊ लागली आहे.
तूर्त खासदार मुद्दाम लपून राहिले नाहीत, असे सांगितले जाते. एक खासदार दिल्लीत संसदेच्या अधिवेशनासाठी आहेत. मात्र ते गोव्यात असते तरी, संतप्त खाण अवलंबितांना काय म्हणून उत्तर देणार होते असा प्रश्न येतो. ते खाण अवलंबितांना सामोरे जाऊच शकले नसते अशा प्रकारची चर्चा गोवा सरकारमध्येही सुरू आहे. काही मंत्र्यांनीही यापूर्वी खाण अवलंबितांचा प्रक्षोभ पाहिलेला आहे. गोव्याचा खाणप्रश्न पंतप्रधानांर्पयत नेऊ न शकलेल्या तिन्ही खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खाण अवलंबित करू लागले आहेत. यापुढे तर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह उर्वरित दोन्ही खासदारांवर लपून राहण्याची पाळी येईल अशी चर्चा खाण अवलंबितांमध्ये सुरू झाली आहे. कारण केंद्र सरकार एमएमडीआर कायदा दुरुस्त करू पाहत नाही. दुरुस्ती आणण्यासाठी आता वेळच शिल्लक राहिलेला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वगैरे चार-पाच मंत्री असलेल्या केंद्राच्या समितीने गोव्याच्या खाण प्रश्नामधून आपले अंग काढले आहे.
केंद्र सरकारला गोव्याचा खाणप्रश्न सोडविण्याबाबत उत्साह राहिलेला नाही याची कल्पना गोवा भाजपच्या काही प्रमुख पदाधिका:यांनाही आली आहे. पुती गावकर यांनी आंदोलन वाढवत ठेवू नये म्हणून भाजपचे काही पदाधिकारी प्रयत्न करू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खाणपट्टय़ात असंतोष वाढलेला भाजपला नको आहे पण केंद्र सरकारही गोव्यातील खनिज खाणी नव्याने सुरू करण्यासाठी मोठा उपाय काढील अशी शक्यता दिसत नाही.
अॅटर्नी जनरलांकडे गोव्याचा प्रश्न गेला तेव्हा खनिज लिजांचा लिलावच पुकारावा लागेल अशा प्रकारचा अभिप्राय त्यांनी दिल्याची चर्चा गोव्यातील काही आयएएस अधिका:यांच्या स्तरावर सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी गुरुवारी खाण अवलंबितांसमोर येण्याचे टाळले. त्यांनी एक प्रकारे लपून राहणो पसंत केले असे खाण अवलंबितांचे म्हणणे आहे. यापुढे खासदारांना व काही मंत्र्यांनाही खाण अवलंबितांच्या आक्रमक रुपामुळे लपून राहण्याची वेळ येईल असेच स्पष्ट संकेत मिळतात.