पणजी - गोवा-मुंबई बोट सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार असल्याचे संकेत मुरगांव पोर्ट ट्रस्टच्या अधिका-यांनी दिले आहेत. वास्तविक ही बोट सेवा चालू महिन्यापासूनच सुरु होणार होती परंतु बोटीवरील काही काम शिल्लक राहिल्याने ते पूर्ण करुन डिसेंबरमध्येच ही सेवा सुरु होईल, असे सांगण्यात आले. गोवा-मुंबई बोटसेवेचे सुतोवाच केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नीतीन गडकरी यांनी अलीकडेच ‘लोकमत’च्या जीवनगौरव सोहळ्यावेळी केले होते.
मुरगांव बंदर न्यासच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बोटीची ६00 प्रवाशांची क्षमता असेल. बोटीत दोन रेस्टॉरण्टस तसेच जलतरण तलावही असेल. गोव्यातून निघाल्यानंतर आठ तासात ही बोट मुंबईत पोचणार आहे. आठ तासांचा प्रवास असला तरी प्रवाशी १२ ते १५ तासांपर्यंत या बोटीत घालवू शकतात.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना घेऊन येणा-या मोठ्या विदेशी जहाजांचा हंगामही आता सुरु झाला आहे. येत्या हंगामात ४0 मोठी प्रवासी जहाजे मुरगांव बंदरात येतील, असे सांगण्यात आले. ओशियाना क्रुझचे ‘एमएस नाउटिका’हे जहाज येत्या १४ नोव्हेंबर रोजी मुरगांव बंदरात दाखल होत आहे. त्यासाठी बंदरात सर्व सज्जता ठेवण्यात आलेली आहे, असे अधिका-यांनी सांगितले. गेल्या वर्षी ३९ आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे मुरगांव बंदरात आली. २0२२ पर्यंत अशी किमान १00 मोठी जहाजे (क्रुझ लायनर) बंदरात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.