पणजी : महापालिका निवडणुकीत 30 पैकी 25 जागांवर बाबुश मोन्सेरात अर्थात भाजप पॅनलचे उमेदवार विजयी ठरले. ‘वुई पणजीकर’ पॅनलकडे केवळ ४ जागा गेल्या तर एका प्रभागात अपक्ष निवडून आला. शेखर डेगवेंकर, सोराया पिंटो माखिजा, रेखा कांदे, रुपेश हळर्णकर, किशोर शास्री आदी मावळत्या नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला. प्रभाग 6 मध्ये सुरेंद्र फुर्तादो तर प्रभाग ९ मध्ये त्यांची पत्नी रुथ फुर्तादो निवडून आल्या. प्रभाग 23 मध्ये बाबुश पॅनलसाठी सर्वाधिक धक्कादायक निकाल ठरला.
संतोष सुर्लीकर या उमेदवाराने अखेरच्या टप्प्यात तेथे मुसंडी मारली. डेगवेकर हे महापालिका मार्केट समितीचे अध्यक्ष होते. प्रभाग 1 मध्ये वुई पणजीकर पॅनलचे नेल्सन काब्राल विजयी ठरले. बाबुश पॅनलचे माल्कम आफोंसो यांचा त्यांनी पराभव केला. नेल्सन यांना 381 तर माल्कम यांना 322 मतं मिळाली. बाबुश यांचे पुत्र रोहित हे प्रभाग 3 मधून तब्बल 294 मतांनी निवडून आले. त्यांना 498 तर त्यांचे प्रतिस्पर्धी जुझे मार्टिन्स यांना 204 मतं मिळाली.
प्रभाग 10 मध्ये बाबुश पॅनलचे प्रसाद आमोणकर विजयी ठरले त्यांना 299 तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी विष्णू नाईक यांना 201 मतं मिळाली. विक्रमी 89.29 टक्के मतदान झालेल्या प्रभाग 11 मध्ये करण यतिन पारेख विजयी ठरले. त्यांना 366 मतं मिळाली. तेथे बाबुश यांचे एकेकाळचे हस्तक नागेश करीशेट्टी यांनी बाबुशकडे बंडखोरी करीत करण यतिन पारेख याच्याविरोधात उमेदवारी भरली. करिशेट्टी तिसऱ्या स्थानी फेकले गेले. त्यांना 126 मतं मिळाली.
प्रभाग 21 मध्ये भाजप बंडखोर रेखा कांदे यांचा पराभव झाला. तेथे बाबुश पॅनलच्या मनिषा मणेरकर निवडून आल्या. प्रभाग 29 मध्ये रुपेश हळर्णकर यांचा पराभव झाला. बाबुशचे उमेदवार सिल्वेस्टर फर्नांडिस यांना 258 मतं मिळाली.
बंडखोरांना श्रेय नाही - बाबुश
30 पैकी 30 जागांवर विजय मिळविण्याचे बाबुश यांचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, पाच उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. त्यांच्याबाबतीत मी कमी पडलो. भाजप बंडखोरांना त्यांच्या पराभवाचे श्रेय मुळीच नाही.