- समीर नाईकपणजी - गोव्यातील शिक्षक अविनाश मुरलीधर पारखे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. अविनाश पारखे हे राज्यातील 'दिशा' या विशेष मुलांच्या शाळेत शिकवीत होते. विशेष मुलांच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा पाहता त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस निमित्त ५ सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे. याच दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पारखे यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. देशभरातील सुमारे ७५ सर्वोत्कृष्ट शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार आहे. मानपत्र, ५० हजार रोख आणि एक रौप्य पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील मिळणार आहे.
अविनाश मुरलीधर पारखे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.