गोव्यात काँग्रेसची राज्य कार्यकारिणी अखेर जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 08:12 AM2019-01-07T08:12:12+5:302019-01-07T08:15:23+5:30
काँग्रेसची राज्य कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली असून प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीनंतर तब्बल आठ महिन्यांनी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.
पणजी - काँग्रेसची राज्य कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली असून प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीनंतर तब्बल आठ महिन्यांनी ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. तरुण आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. काहीजणांना बढत्या देण्यात आल्या आहेत. नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक मंगळवारी दुपारी 3 वाजता येथील गोवा चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात बोलावण्यात आली आहे.
12 उपाध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून यात तीन विद्यमान आणि एका माजी आमदाराचा समावेश आहे. आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्स, आमदार नीळकंठ हळर्णकर, आमदार आलेक्स रेजिनाल्द व माजी आमदार धर्मा चोडणकर यांच्यासह एम. के. शेख, मोती देसाई, डॉ. प्रमोद साळगांवकर, आल्तिन गोम्स, बाबी बागकर, गुरुदास नाटेकर, विठोबा देसाई, संकल्प आमोणकर यांचा यात समावेश आहे.
एकूण 12 सरचिटणीस नियुक्त करण्यात आले आहे त्यात माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, सगुण वाडकर, सुभाष फळदेसाई, ट्रिबोलो सौझा, अमरनाथ पणजीकर, विजय पै, यतिश नायक, एजिल्दा सापेको, जनार्दन भांडारी, प्रदीप नाईक, जोझेफ वाझ व सुनिता वेरेंकर यांचा समावेश आहे.
26 सचिव नियुक्त करण्यात आले असून यालत मारियो पिंटो, मोहन धोंड, अतुल वेर्लेकर, दामोदर शिरोडकर, सैफुल्ला खान, दिलीप धारगळकर, रितेश नाईक, गोविंद फळदेसाई, फ्रँकी पिरीस, सावित्री कवळेकर, शेख शब्बीर, रजनीकांत नाईक, नानू बांदोडकर, नारायण रेडकर, खेमलो सावंत, आनंद नाईक, महादेव देसाई, जॉन डिकॉस्ता, सुभाष केरकर, नीळकंठ गांवस, धर्मेश सगलानी, शाणू वेळीप (झेडपी), दिनेश जल्मी, मोरेनो कार्लुस रिबेलो (झेडपी), मारियानो रॉड्रिग्स (झेडपी) व एव्हरसन वालीस यांचा समावेश आहे. या शिवाय कार्यकारिणीवर 23 सदस्य नियुक्त केलेले आहेत.
ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे, लुइझिन फालेरो, रवी नाईक आदींचा समावेश असलेली 18 जणांची कायम निमंत्रित समिती नेमण्यात आली आहे. माध्यम विभागाचे चेअरमनपदी अॅड. रमाकांत खलप, मुख्य प्रवक्तेपदी सुनिल कवठणकर तर प्रवक्ते म्हणून माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, ऊर्फान मुल्ला, सिध्दनाथ बुयांव, स्वाती केरकर, विठू मोरजकर व अॅड. रोहित ब्रास डिसा यांची नियुक्ती केलेली आहे.
एक व्यक्ती एक पद हे तत्त्व पाळल्याचा दावा
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘ प्रदेश समितीवर तरुण आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना स्थान देऊन प्रोत्साहित केले आहे. एक व्यक्ती एक पद हे तत्त्व पाळण्यात आले आहे. पूर्वी एकाच व्यक्तीकडे दोन दोन पदांच्या जबाबदाऱ्या असायच्या. यावेळी या गोष्टीला कटाक्षाने बगल दिली आहे.
गिरीश यांची गेल्या मे महिन्यात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यावेळी पदाचा ताबा घेताना त्यांनी आपल्याला प्रदेश समितीवर एसी कार्यालयात बसणारे नव्हे, तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे हवेत, असे विधान केले होते. आता राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्याने दोन मतदारसंघांमधील विधानसभा पोटनिवडणुका तसेच लोकसभा निवडणुकीसाठी कामाला आणखी गती येणार आहे.