पणजी - राज्यभरातील पंचतारांकित आणि अन्य मोठय़ा हॉटेलांमध्ये फक्त एक-दोनवेळा वापरून जे साबण टाकून दिले जातात, त्या साबणांचा वापर आता चांगल्या कामासाठी केला जाणार आहे. हे साबण कच:यातून फेकून न देता त्यांच्यावर प्रक्रिया करून हे साबण नव्या रुपात अत्यंत गरीब विद्यार्थी व महाराष्ट्र आणि अन्य भागांतील आदिवासींच्या मुलांसाठी दिले जाणार आहेत.
मुंबईत असा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसाच प्रयोग आता गोव्यात केला जाणार असून त्याचा आरंभ झाला आहे. गोवा सरकारचे कचरा व्यवस्थापन महामंडळ, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा आणि चेंबर ऑफ कॉमर्स संघटना यांनी मिळून सुंदर इंडिया नावाच्या संस्थेला या कामी मदत करावी असे ठरवले आहे. शुक्रवारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केनेथ डिसोझा यांनी सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रीग्ज, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष सावियो मासायस व इतरांसोबत येथे पत्रकार परिषद घेतली. गोव्यातील हॉटेलना साबण गोळा करून एकत्र ठेवण्याची सूचना केल्यानंतर काम सुरूही झाले आहे, असे मासायस यांनी सांगितले.
एरव्ही जे साबण टाकून दिले जातात, ते मग साळगावच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये येत असतात. मोठय़ा प्रमाणात टाकाऊ साबण येतात. या साबणांवर प्रक्रिया करून नव्या रुपात जर साबण आले व ते कुणाच्या तरी उपयोगासाठी पुन्हा आले तर पर्यावरणाचेही रक्षण होईल, असे संजीत रॉड्रीग्ज म्हणाले. महामंडळाकडून सुंदर इंडिया चॅरिटेबल ट्रस्टला या कामी सहाय्य केले जाईल. साबण एकत्र गोळा करून कुठे ठेवावे ते निश्चित केले जाईल. तिथून मग टाकाऊ साबणांची एकत्रितपणो वाहतूक केली जाईल. गोव्यात महिन्याला 1 टन टाकाऊ साबण गोळा होतील, असा विश्वास रॉड्रीगीज यांनी व्यक्त केला.
केनेथ डिसोझा म्हणाले, की अगदी छोटय़ा हॉटेलांमध्ये साबण पूर्णपणो वापरले जातात पण मोठय़ा हॉटेलांमध्ये खूपच कमी वापरून टाकून दिले जातात. अम्ही मुंबईला अशा साबणांवर प्रक्रिया करतो. त्यांना पूर्णपणो नवे रुप दिले जाते. हे साबण वापरण्यास योग्य आहेत अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासकीय यंत्रणोकडून प्राप्त केले जाते. त्यानंतरच त्यांचे वितरण मोफतपणो आदिवासींची मुले व अन्य गरीब घटकांची मुले यांच्यासाठी केला जातो. देशात अनेक भाग असे आहेत, जिथे अत्यंत गरीब मुले साबणाचा वापरच करत नाहीत. कारण त्यांना साबण आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. अशा मुलांसाठी आम्ही काम करतो.