पणजी : कोल्हापूरहून नऊ मुले विनापरवाना गोव्यात आणल्याची घटना उघडकीस आली आहे. आश्रय व निवारा देण्याच्या नावाखाली आणलेल्या या मुलांना सांताक्रुझ येथील एका घरात ठेवले होते व त्यासाठी बालकल्याण समितीची परवानगीही घेतली नव्हती. गोवा पोलिसांनी कारवाई करून मुलांना अपना घरमध्ये पाठविले आहे. ही मुले कोल्हापूर येथील ‘माय फादर्स हाउस’ या बिगर सरकारी संस्थेच्या आश्रयगृहात होती. अमान्युएल गायकवाड आणि कोरियन नागरिक कुकु किमो ऊर्फ डेव्हीड ही बिगर सरकारी संस्था चालवित होते. त्यांना २०१४ मध्ये गोव्यात आणले होते. सांताक्रुझ येथील एका इमारतीत त्यांना ठेवण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी काही देशी विदेशी लहान मुले दिसू लागल्यामुळे स्थानिकांनी याची माहिती ‘अर्ज’ या बिगर सरकारी संस्थेला दिली. या संस्थेकडून पणजी पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि १६ मार्च रोजी पणजी पोलिसांनी या वास्तूवर छापा टाकला. त्या वेळी इंग्लंड येथील तिमोती जेडेस नामक व्यक्तीच्या आश्रयाला असलेल्या ९ मुलांना ताब्यात घेण्यात आले. जेडेस यांनी त्यांची स्वयंसेवी संस्था असल्याचे सांगितले तसेच काही अडचणी असलेल्या मुलांना ते आश्रय देत असल्याचे सांगितले; परंतु मुलांना गोव्यात आणताना आवश्यक असलेला बालकल्याण समितीचा परवाना त्यांना सादर करता आला नाही. त्यामुळे त्यांचे हे स्वयंसेवी काम असले तरी ते बेकायदा ठरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पोलिसांनी जेडेस यांचा पासपोर्ट जप्त केला आहे; परंतु त्यांना अटक करण्यात आलेली नाही. मुलांना सध्या अपना घरमध्ये ठेवण्यात आले आहे. ९ पैकी दोन मुले ही एचआयव्ही बाधित असल्याचीही माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
कोल्हापूरहून नऊ मुले विनापरवाना आणली गोव्यात
By admin | Published: April 26, 2015 1:35 AM