पणजी - मधुमेहग्रस्तांनाआरोग्य खात्यातर्फे आता विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून त्याचा शुभारंभ बुधवारी (5 सप्टेंबर) होत आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रे, उप-जिल्हा इस्पितळे आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘डायबेटिक केअर’ उपक्रमांतर्गत उपचारांची खास सोय उपलब्ध होणार असून रुग्णांना इन्सुलिन मोफत दिले जाईल.
आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार मधुमेहींवर उपचारांसाठी आवश्यक ते प्रशिक्षण आरोग्य खात्याच्या कर्मचा-यांना दिले जाईल. राज्यात कुठल्या भागात मधुमेहाने ग्रस्त किती रुग्ण आहेत याची माहिती मिळवून डायबेटिक रजिस्ट्रीचा फेरआढावा घेतला जाईल. गेली पाच वर्षे डायाबेटिक रजिस्ट्री कार्यरत नव्हती. याचा आढावा घेण्याचा निर्णय आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गेल्या वर्षी घेतला. मधुमेहापासून बचावासाठी खबरदारी म्हणून काय करता येईल याबाबतही जागृती केली जाईल. केंद्र सरकारच्या ‘आयुषमान भारत’ योजनेतून यासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.
बुधवारी उद्घाटनाच्या कार्यक्रमास डॅनिश राजदूत उपस्थित राहणार आहेत. राज्यात मधुमेहाने ग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. जागतिक स्तरावर मधुमेहींचे प्रमाण पुढील दोन दशकांमध्ये दुप्पटीने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या पार्श्वभूमीवरच विशेष कार्यक्रम राबविला आहे.
दरम्यान, राज्यातील दुर्गम खेड्यांमध्ये लोकांना रक्तचाचणीसाठी आय स्टॅट उपकरणे उपलब्ध करण्याचाही सरकारचा विचार आहे. ही उपकरणे प्राप्त झाल्यानंतर लोकांना रक्त तपााणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही जावे लागणार नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार किमान अर्धा तास चालणे, जलतरण तसेच सायकल चालविल्याने मधुमेहाचा धोका ४0 टक्क्यांनी कमी होतो. याशिवाय आहाराबाबतही खबरदारी घेणे आवश्यक आहे. मधुमेह जडलेल्या व्यक्तीला अवयव निकामी होण्याचा धोका असतो. गोव्यात हा आजार ‘किलर’ ठरला आहे