- वासुदेव पागीपणजी - उच्च माद्यमिक विद्यालयानंतर आता विशेष मुलांच्या शाळांतही रोबोटिक्स आणि कोडिंग अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
विशेष मुलेही रोबोटीक्स, कोडींग , डिकोडींग शिकणार आणि त्या शिक्षणाचा प्रत्यक्ष वापरही करणार आहेत. तसा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारीही करण्यात आलेली आहे.
सुरुवातीला, लोकविश्वास प्रतिष्ठान, संजय स्कूल आणि सेंट झेविअर अकादमी या तीन विशेष शाळांमधून प्रत्येकी सात शिक्षकांना रोबोटिक्स आणि कोडिंग अभ्यासक्रमाचे काही मूलभूत प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यांना संगणकीय डिझाइन, अँनिमेशन बनविणे, ब्लॉक-आधारित कोडिंग करणे व इतर प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी पूर्ण पाडील या बद्दल तांत्रिक शिक्षण खात्याच्या रोबोटीक्स संबंधीच्या विशेष विभागाला विश्वास आहे. या विभागावरच या प्रकल्पावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विजय बोर्जीस हे या विभागाचे प्रकल्प संचालक आहेत.
या विशेष विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देताना श्रेणींचा विचार करून ते दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुमारे २० श्रेणी आहेत, त्यापैकी काही श्रेणीतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम अधिक सक्रियपणे शिकवला जाऊ शकतो तर काहींना तो हळू हळू शिकवावा लागतो. काही मुले हे समजून घेण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार होतील तर काहींना वेळ लागेल असे एका अधिकाऱ्याने या विषयी माहिती देताना सांगितले.
राज्यात उच्च माद्यमिक स्तरावर रोबोटीक्स व कोडींग अभ्यासक्रम लागू करताना ४३४ सरकारी आणि अनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील ६५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स आणि कोडिंग अभ्यासक्रम खुला करण्यात आला आहे. त्यानंतर आता विशेष मुलांपर्यंत हे प्रशिक्षण पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे.